अमेरिकेत हिंदुस्थानी वंशाच्या महिलेची पतीने केली हत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गुगलमध्ये सिनियर इंजिनियर म्हणून काम करणाऱ्या शीतल र्झेसिएन (वय ५७) या हिंदुस्थानी वंशाच्या महिलेची तिच्या पतीने गोळ्या झाडून निर्घृण हत्या केली आहे. कौटुंबिक वादातून ही हत्या झाल्याचे समजते. दरम्यान या गोळीबारात शीतल यांचा २३ वर्षांचा मुलगा जेसन हा देखील गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पोलिसांनी नराधम पती कर्क र्झेसिएन (वय ५६) याला बेड्या ठोकल्या आहेत.

जॉर्जिया राज्यातील स्मिरना शहरात मंगळवारी रात्री आठच्या सुमारास ही घटना घडली. पोलिसांना घरात गोळीबार झाल्याचा फोन आला होता. पोलीस घटनास्थळी पोहोचले तेव्हा त्यांना घरात शीतल र्झेसिएन या रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या आढळल्या. तर त्यांचा मुलगा जेसन हा घराबाहेर गंभीर जखमी अवस्थेत पडलेला आढळला. त्याच्यावरही वडिलांनीच गोळी झाडल्याचे समोर आले आहे. त्याला तातडीने स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या भयंकर कृत्यानंतर कोब काउंटी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत ५६ वर्षीय पती कर्क र्झेसिएन याला राहत्या घरातून अटक केली. सध्या त्याची रवानगी ‘कोब काउंटी ॲडल्ट डिटेंशन सेंटर’मध्ये करण्यात आली असून, कोर्टाने त्याला जामीन नाकारला आहे.

शीतल र्झेसिएन यांचे बालपण आणि शिक्षण इंग्लंड, हिंदुस्थान आणि घाना अशा विविध देशांमध्ये झाले. त्यानंतर त्यांनी अमेरिकेतील नामांकित ‘जॉर्जिया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’मधून कॉम्प्युटर सायन्सचे उच्च शिक्षण पूर्ण केले होते. गुगल कंपनीत त्या ‘इंजिनिअरिंग लीडर’ म्हणून गेल्या २० वर्षांपासून काम करत होत्या.