आयटीआयमध्ये गेल्या वर्षात 257 विद्यार्थ्यांनी केले धर्मांतर, माजी कुलगुरूंचा अहवाल विधिमंडळात सादर

राज्यातील विविध औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये (आयटीआय) गेल्या वर्षात प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जमाती प्रवर्गातील एकूण 257 विद्यार्थ्यांनी हिंदू व्यतिरिक्त धर्माची नोंद केल्याची धक्कादायक माहिती माजी कुलगुरूंच्या अहवालातून पुढे आली आहे. यात बौद्ध, मुस्लिम, ख्रिस्ती, शिख व इतर धर्मांचा समावेश आहे.

राज्याचे काwशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात आज हा अहवाल सादर केला. राज्यातील काही आदिवासी व्यक्तींनी आपल्या धर्माचा त्याग करून इतर धर्म स्वीकारला असतानाही आदिवासी विभागाच्या मिळणाऱया सुविधांचा लाभ घेतला असल्याचे प्रकरण नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात काही आमदारांनी उपस्थित केला होता. आयटीआयमध्ये बोगस विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतल्याचा आरोपही आमदारांनी लक्ष्यवेधीच्या माध्यमातून केला होता. त्यावेळी काwशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी निवेदन सादर करतानाच याप्रकरणी चौकशी समितीची घोषणा केली होती.

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीत प्रतिभा मसराम, अॅड. किरण गभाळे यांचा समावेश होता. त्यानंतर या समितीने आदिवासी विकास विभाग, अल्पसंख्याक विभाग तसेच सामाजिक न्याय विभागामार्फत चालविण्यात येणाऱया वसतिगृहांची यादी आणि प्रवेशाची नियमावली माहिती तपासून आणि गॅझेटच्या उपलब्ध माहितीनुसार वरील बाब समोर आली आहे.

या अहवालानुसार अनुसूचित जमाती प्रवर्गातून प्रवेश घेतलेल्या 13 हजार 858 इतक्या विद्यार्थ्यांची माहिती तपासली असता 257 प्रकरणी प्रशिक्षणार्थ्यांनी हिंदू व्यक्तिरिक्त इतर धर्म नोंदविला आहे. त्यात बौध्द 4, मुस्लिम 37, ख्रिश्चन 3, तर 22 जणांची माहिती उपलब्ध झाली नाही. इतर 190, शिख 1 अशा एकूण 257 जणांचा समावेश आहे. या समितीने उपाययोजनाही सुचविल्या आहेत. त्यात प्रामुख्याने प्रत्येक जिह्यातील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी यांनी संबंधित ठिकाणी भेट देऊन अहवाल सादर करण्याची सूचना करण्यात आली आहे. तर धर्म बदलला असेल तर त्यांना आदिवासी मिळणाऱया सवलती ग्राह्य राहतील काय? याबाबत समितीने सर्वंकष अभ्यास करून त्याबाबतचा अहवाल सादर करण्याची सूचना देण्यात आली आहे.