आईने सीमकार्ड देण्यास नकार दिल्याने 12 वर्षाच्या मुलाची आत्महत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक

सामना ऑनलाईन। लुधियाना

पंजाब मधील लुधियाना येथे आईने सीमकार्ड देण्यास नकार दिल्याने एका १२ वर्षाच्या मुलाने गळफास लावून आत्महत्या केल्याची भयंकर घटना घडली आहे. पारस असे त्याचे नाव असून तो सातवीत शिकत होता. ही घटना बुधवारी दुपारी घडली आहे. दरम्यान, याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.

पारसकडे मोबाईल होता. पण काही दिवसांपूर्वी रागाच्या भरात त्याने त्यातील सीमकार्ड फाडले होते. यामुळे बुधवारी दुपारी शाळेतून घरी आल्यानंतर त्याने आईकडे नवीन सीमकार्डची मागणी केली. पण आईने व घरातील इतरांनी त्याला नवीन सीमकार्ड घेऊन देण्यास नकार दिला. त्यामुळे वैतागलेला पारस बेडरुममध्ये निघून गेला. यादरम्यान, आईने जेवण बनवले व पारसला बोलावण्यासाठी ती त्याच्या बेडरुममध्ये गेली. बेडरुमचा दरवाजा उघडताच तिला धक्काच बसला. पारस पंख्याला गळफास घेतलेल्या अवस्थेत लटकत होता. हे पाहताच पारसच्या आईने मदतीसाठी शेजाऱ्यांना बोलावले. त्यानंतर पारसला रुग्णालयात नेण्यात आले. पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.