बुलढाण्यात आरटीओकडून 155 वाहन धारकांचा परवाना निलंबित

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

सामना प्रतिनिधी । बुलढाणा

वाहतूक नियमांचे पालन न करणार्‍या दोषी वाहन धारकांविरूद्ध उप प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत मोटार वाहन अधिनियम 1988 चे कलम 19 व केंद्रीय मोटार वाहन नियम 1989 चे नियम 21 अन्वये विविध गुन्ह्यांनुसार कारवाई करण्यात आली. आरटीओ कार्यालयाने या प्रकरणी 155 वाहन धारकांचा वाहन चालविण्याचा परवाना 90 दिवसांसाठी निलंबित करण्यात आला. ही कारवाई उप प्रादेशिक परिवहन अधिकारी जयश्री दुतोंडे यांनी केली आहे.

विहीत मर्यादेपेक्षा जास्त वेगाने वाहन चालविणे, सिग्नल तोडणे, मालवाहू वाहनातून क्षमतेपेक्षा जास्त मालाची वाहतूक करणे, मालवाहू वाहनातून प्रवासी वाहतूक करणे, नशेत वाहन चालविणे, वाहन चालविताना मोबाईल फोनचा वापर करणे अशा गुन्ह्यांमध्ये तब्बल 95 परवाने निलंबित केले. तसेच पोलीस विभागाने केलेल्या कारवाईद्वारे 60 दोषी वाहन चालकांचे परवानेही निलंबित करण्यात आले आहे. हेल्मेटचा वापर न करणार्‍या 601 दोषी वाहन धारकांना उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, बुलढाणा मार्फत प्रतिवेदीत करण्यात आले असून 50 हजार 500 रूपयांचा दंडही वसूल करण्यात आला आहे.

नियमानुसार न लावलेल्या प्रकाशाची दिवे दुचाकी व अन्य वाहनांना लावल्यामुळे समोरून येणार्‍या वाहन चालकास काहीच दिसून येत नाही. त्यामुळे अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण होते. सदर पांढर्‍या लाईटचा वापर करणार्‍या व हेल्मेटचा वापर न करणार्‍या वाहनधारकांविरूद्ध कारवाई करण्याचा निर्णय जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे. त्यानुसार अशी प्रकाश दिवे असलेल्या वाहनांविरूद्ध कारवाई करण्यात येत आहे. तरी वाहन धारकांनी आपल्या वाहनांना लावण्यात पांढरे प्रकाश दिवे लावले असल्यास ते काढून टाकावे. सदर दिवे न काढल्यास त्या वाहनांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार जिल्ह्यात होणार्‍या अपघातांची संपूर्ण कारणी मीमांसा व समीक्षा करण्यासाठी पोलीस, परिवहन, सार्वजनिक बांधकाम, जिल्हा परिषद बांधकाम विभाग यांची रस्ता सुरक्षा समिती स्थापन करण्यात आली आहे. त्यांचेमार्फत जिल्ह्यात जिवीत हानी झालेल्या अपघातांची पाहणी करण्यात येणार आहे, अशी माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी जयश्री दुतोंडे यांनी दिली आहे.