
रिझर्व्ह बँकेने शुक्रवारी दोन हजाराची नोट चलनातून अचानक बाद केली. मात्र 30 सप्टेंबरपर्यंत नोटा बदलण्याची मुदत दिली असली तरी आत्तापासूनच बडे व्यापारी आणि श्रीमंतांनी दोन हजारांच्या नोटा जिरवायच्या कुठे? यावर नवनवीन फंडे शोधण्यास सुरुवात केली आहे. गुजरातमध्ये सोने खरेदी वाढली. त्यामुळे प्रतितोळा सोन्यासाठी 70 हजार रुपये मोजले जात आहेत. काहींनी व्यापाऱयांची उधारी देण्यासाठी दोन हजारांच्या नोटा बाहेर काढल्या आहेत. दरम्यान, या परिस्थितीत शिर्डीतील श्री साईबाबा संस्थानने ‘श्रद्धा आणि सबुरी’चा सल्ला दिला असून 30 सप्टेंबरनंतर दोन हजारांच्या नोटा दानपेटीत टाकू नये, असे आवाहन भक्तांना केले आहे.
गुजरातमध्ये सोने 70 हजार
दोन हजारांच्या नोटा 30 सप्टेंबरपर्यंत बदलता येतील, पण एकावेळी फक्त दहा नोटा म्हणजे 20 हजार रुपयेच बदलून मिळणार आहेत. मात्र ज्यांच्याकडे दोन हजारांच्या चलनात लाखो-करोडे रुपये आहेत त्या बडय़ा व्यापाऱयांनी आता सोने-चांदी खरेदीचा उपाय शोधला आहे. दोन हजारांच्या नोटा देऊन सोने खरेदी केल्यास प्रतितोळा 70 हजार रुपये आणि चांदी 80 हजार रुपयांना विकत घेतली जात आहे.
सोने महागणार
दोन हजारांच्या नोटांची मोठी रक्कम बँकांमध्ये जमा केली तर वार्षिक उत्पन्न वाढेल आणि आयकर भरावा लागेल. चौकशी होऊ शकते. त्यामुळे लोकांनी सोने खरेदीचा उपाय शोधला आहे, असे आयआयएफएल सिक्युरिटीजचे उपाध्यक्ष अनुज गुप्ता यांनी सांगितले. त्यामुळे सोने महागेल असे ते म्हणाले.
पंजाबमधील व्यापाऱ्यांचा फायदा
पंजाबच्या लुधियानामधील व्यापाऱयांचा मात्र या नोटाबंदीमुळे अनोखा फायदा झाला आहे. बाजारपेठेत अडकलेले उधारीचे पैसे आता न मागता रात्रीपासूनच परत मिळू लागले आहेत. थांबलेली बिले आता मिळू लागली आहेत. बाजारात तेजी आली आहे, असे होजिअरी व्यावसायिक रमण चोप्रा यांनी सांगितले.



























































