हमीभावात २०० रुपयांनी वाढ, केंद्र सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

२०१९ च्या निवडणुकांपूर्वी शेतकऱ्यांना आकर्षित करण्यासाठी मोदी सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. खरीपाच्या हंगामात एकूण १४ प्रकारच्या पीकांचे उत्पादन घेतले जाते. ज्यात गहू तांदळाचा समावेश आहे. त्यांच्या हमीभावात २०० रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. देशात शेतकर्‍यांची संख्या ही २५ कोटी इतकी आहे, या सर्व शेतकर्‍यांना या निर्णयाचा मोठा फ़ायदा होईल. गहू तांदळाचा सध्याचा हमीभाव १५५० इतका होता त्यात २०० रुपयांनी वाढ झाल्याने आतो १७५० प्रति क्विंटल इतका झाला आहे.

सरकारने गहू, तांदूळ, मका सारख्या खरीप पीकांच्या हमीभावात दीडपट वाढ केली आहे. हमीभाव म्हणजे ज्या दराने सरकार शेतकऱ्यांकडून त्यांचं उत्पादन विकत घेते तो दर. साहजिकच आहे हा दर वाढवल्याने शेतकऱ्यांचं उत्पन्न देखील वाढणार आहे. शेतकर्‍यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी या हमीभावात वाढ करण्यात आली आहे.

अ दर्जाच्या गहू तांदळाचे हमीभाव १५९० वरून १७७० रुपये प्रति क्विंटल करण्यात आली आहे. या सगळ्यात नाचणीचा हमीभाव ५२.५ टक्क्यांनी वाढवला आहे. ज्वारीचा हमीभाव ४२ टक्यांनी, बाजरीचा हमीभाव ३६.८ टक्क्यांनी अर मुगाचा हमीभाव हा २५.१ टक्क्यांनी वाढवला आहे. पण तुरच्या हमीभावात ४.१ आणि उडीदच्या हमीभावात फ़क्त  ३.७ टक्क्यांनी वाढ केली आहे.

यापूर्वी गहू, तांदूळच्या हमीभावात सर्वाधिक वाढ ही १५५ रुपयांनी केली होती. संपुआ च्या काळात २००८-०९ साली ही वाढ केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी ३ जुलै रोजी कुषी मंत्री राधा मोहन सिंह आणि नीती आयोगच्या सदस्यांशीचर्चा केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२२ पर्यंत शेतकर्‍यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे उद्दिष्ट ठेवले होते. एका मासिकाला मुलाखत देताना त्यांनी हमीभाव वाढीच्यानिर्णयाचे संकेतही दिले.