
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
नोटाबंदीनंतर केंद्र सरकारने 500, 1000 च्या नोटा बंद केल्या आणि 2000 च्या मोठय़ा गुलाबी नोटा बाजारात आणल्या होत्या. मध्यंतरीच्या काळात या 2000च्या नोटाही बंद होणार असल्याची अफवा उठली होती. कारण त्या बाजारात चलनातून हळूहळू कमी होत चालल्या होत्या. तेव्हा खुद्द रिझर्व्ह बँकेने (आरबीआय)च या नोटा बंद होणार नसल्याचे स्पष्ट केले होते. आता निवडणूक काळात या नोटाच चलनातून गायब झाल्या आहेत. त्याचे गौडबंगाल काय, या विचाराने आरबीआय आणि देशातील बँकाही चक्रावून गेल्या आहेत.
कानपूरची जप्ती चक्रावून टाकणारी
कानपूर शहरात निवडणूक आयोगाच्या भरारी पथकांनी जप्त केलेल्या घबाडात 2000 च्या चार कोटी रुपयांच्या नोटांचा समावेश होता. याचाच अर्थ या नोटा एकतर मतदारांना प्रलोभन दाखवण्यासाठी आणि वाटण्यासाठी ठेवल्या असाव्यात असा कयास पोलीस आणि अन्य विभागांनी व्यक्त केला आहे. कानपूरच्या अनेक करन्सी चेस्टमध्ये 2000 च्या नोटा नावालाच उरल्या आहेत. या नोटा ना रिझर्व्ह बँकेकडे आहेत, ना अन्य बँकांकडे आहेत.
रिझर्व्ह बँकेच्या सूत्रांनुसार 2000 रुपयाच्या नोटा विविध बँका, बाजार आणि एटीएममधून दररोज कमी होत आहेत. त्याजागी 500 आणि 200 रुपयांच्या नोटा मोठय़ा प्रमाणावर वापरल्या जात आहेत. 2000 च्या 80 टक्के नोटा लोकांनी तिजोरीमध्ये ठेवलेल्या आहेत, असा अंदाज रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने वर्तवला आहे.
2000 च्या नोटा गायब होण्याचे प्रमाण वाढले
नोटाबंदीनंतर सहा महिन्यांनी म्हणजेच एप्रिल ते जून 2017 या कालावधीत बँकांमध्ये एकूण रोकडीमध्ये येणाऱ्या 2000 च्या नोटांची संख्या 35 ते 40 टक्के होती. नोव्हेंबर 2017 मध्ये ही संख्या 20 ते 25 टक्के झाली. आता तर अगदी हाताच्या बोटावर मोजता येतील एवढय़ाच 2000 च्या नोटा बँकांमध्ये येत आहेत.

























































