
इटलीतील प्राचीन शहर पोम्पेई तब्बल दोन हजार वर्षानंतर सापडले आहे. ज्वालामुखीच्या लाव्हारसामध्ये हे शहर लुप्त झाले होते. पुरातत्व विभागाला या शहरातील एक खोली सापडली आहे. ही खोली दासींसाठी बनवण्यात आली होती. पुरातत्व विभागाला या खोलीमध्ये एक पलंग (बेड) देखील सापडला आहे. यामुळे रोमन साम्राज्यामध्ये दास-दासींचे जीवन कसे होते याचे रहस्य उलगडणार आहे.
पोम्पेई हे शहर रोमन साम्राज्याचा भाग होता. मात्र 2 हजार वर्षांपूर्वी ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे हे शहर लाव्हारसात लुप्त झाले होते. मात्र आता पुरातत्व विभागाने या थंड झालेल्या लाव्हारसात खोदकाम सुरू केले आहे. खोदकामादरम्यान पुरातत्व विभागाच्या पथकाला खोली सापडली आहे. या खोलीमध्ये लाकडापासून बनवण्यात आलेला एक पलंग सापडला आहे. विशेष म्हणजे या लाकडी पलंकाची उंची यावर झोपणाऱ्या व्यक्तीच्या उंचीनुसार कमी किंवा जास्त करता येत होती. तसेच खोलीच्या वरच्या भागात एक खिडकीही सापडली आहे.
इटलीचे सांस्कृतिक मंत्री डारियो फ्रांसेचिनी यांनी हा एक महत्त्वाचा शोध असल्याचे म्हटले आहे. यामुळे प्राचीन शहर पोम्पेईमध्ये दैनंदिन जीवन कसे होते याची माहिती मिळेल. तसेच त्याकाळी समाजजीवन कसे होते याचाही पत्ता लागेल असेही ते म्हणाले.
दरम्यान, पोम्पेई शहरातील खोली जिथे सापडली त्याच ठिकाणी काही दिवसांपूर्वी एक रथ सापडला होता. जानेवारी महिन्यात पुरातत्व विभागाला येथे एका सेरेमोनियल रथाचे अवशेष मिळाले होते. लग्नकार्यामध्ये या रथाचा वापर केला जात होता. या रथावर आकर्षक नक्शीकामही करण्यात आले होते. लाकडापासून बनवण्यात आलेल्या या रथाला वेगवेगळे रंगही दिलेले होते.



























































