तेलंगणामध्ये अज्ञातांनी 21 भटक्या कुत्र्यांना गोळ्या घालून ठार केले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तेलंगणामध्ये माणूसकीला काळीमा फासणारी भयंकर घटना घडली आहे. मेहबूबनगर जिल्ह्यातील पोन्नाकल येथे काही अज्ञातांनी तब्बल 21 भटक्या कुत्र्यांना गोळी मारून मारण्यात आले आहे. या घटनेनंतर गावात खळबळ उडाली आहे.

राष्ट्रीय महामार्गापासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या या गावात गोळीबार झाल्यानंतर एकही कुत्रा राहिला नसल्याचे सांगण्यात येत आहे. या गोळीबारामध्ये अनेक कुत्रे जखमी झाले आहेत. घटनेनंतर पशुसंवर्धन विभागाने मृतदेहांचे शवविच्छेदन केले, या शवविच्छेदनानंतर कुत्र्यांना आधी विष देऊन त्यानंतर त्यांच्या वर बंदुकीने गोळ्या झाडल्या असल्याचे पशुसंवर्धन विभागाने सांगितले आहे.

या क्रूरतेमागचा नेमका हेतू काय हे अद्याप स्पष्ट झाले नसल्याने या प्रकरणी अज्ञात आरोपींविरोधात शस्त्रास्त्र कायदा आणि प्राणी क्रूरता कायद्यांतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे. मात्र, अद्याप संशयितांची ओळख पटलेली नाही. पोन्नाकल गावात तसेच महामार्गावर एकही सीसीटीव्ही कॅमेरा नसल्यामुळे पोलिसांना आरोपीचा शोध घेण्यास अडचण येत आहे. मात्र या घटनेमुळे आता अधिकाऱ्यांनी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याकरीता पावले उचलली आहेत.

घटनास्थळी पोहोचल्यानंतर पोलिसांनी तेथे सापडलेल्या रिकाम्या काडतुसांची ओळख पटवून पुरावे गोळा करण्यास सुरूवात केली. कुत्र्यांच्या शरिरावर बंदुकीच्या गोळीच्या जखमा आढळून आल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.