
गुरुवारी सर्वांच्या लाडक्या बाप्पाला भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला. गणरायाला निरोप देण्यासाठी मुंबईभर विसर्जन मिरवणुका काढण्यात आल्या. या मिरवणुकांपैकी सगळ्यात मोठ्या मिरवणुका गिरगाव चौपाटीवर काढण्यात आल्या होत्या. चौपाटीवरील विसर्जन मिरवणुकांदरम्यान हरवलेल्या 22 मुलांना शोधण्यात मुंबई पोलिसांना यश आलं आहे.
गणपती विसर्जनासाठी लाखोंचा जमाव मुंबईच्या रस्त्यांवर उतरला होता. मुंबईचे अनेक मोठे आणि मानाचे गणपती गिरगाव चौपाटीवर विसर्जन होण्यासाठी जात असल्याने तिथे जमाव जास्त होता. गणरायाच्या नावाच जल्लोष, तालावर नाचणाऱ्या गर्दीत हात सुटल्याने अनेक मुलं हरवली होती. या मुलांच्या पालकांनी त्वरित धाव घेऊन पोलिसांकडे मदत मागितली होती. पोलिसांनी स्पीकरवरून घोषणा करून त्यांना शोधण्याचे प्रयत्न सुरू केले होते.
गिरगाव चौपाटीवर गर्दीत हरवलेल्या मुलांना शोधून पोलिसांनी त्यांच्या पालकांकडे सुपूर्द केलं आहे. ही एकूण 22 मुलं आहेत. वय वर्षं सात ते 14 दरम्यान असलेल्या या मुलांना त्यांच्या आई बाबांचे, इतर कुटुंबीयांचे संपर्क क्रमांक माहीत होते. काहींनी त्यांचा घरचा पत्ताही सांगितला. त्यामुळे त्यांच्या पालकांना पाचारण करून मुलांची भेट घडवून आणण्यात आली.

























































