
सामना प्रतिनिधी । नाशिक
निफाड तालुक्यात गुरुवारी अतिथंडीमुळे दवबिंदू गोठल्याने सुमारे अडीचशे एकरावरील द्राक्षबागांमधील द्राक्षमणी व पाने जळाली आहेत. हे नुकसान कोटय़वधींच्या घरात आहे. तर थंडीच्या कडाक्याने जिल्ह्यातील सुमारे दोन लाख एकरावरील बागांमधील द्राक्षमण्यांची फुगवण पूर्णतः थांबल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.
निफाड तालुक्यातील कुंदेवाडी येथे गुरुवारी या हंगामातील नीचांकी 1.8 अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदविले गेले. तीन अंशांच्या खाली तापमान जाणे हे द्राक्षबागांसाठी हानीकारक ठरते. जिह्यात काल बहुतांश भागात तापमान 3 ते 5 अंशांदरम्यान होते. निफाड तालुक्यातील उगाव, शिरवाडे वणी, रौळस, कारसुळ, लोणवाडी, पिंपळगाव बसवंत, कोकणगाव, ओझर, सुकेणे, साकोरे, पिंपळस या भागात अतिथंडीने दवबिंदू गोठले होते. यामुळे द्राक्ष घड व पानांमध्ये पाणी उतरल्याने ते काळे पडून सुकले आहेत. हे बहुतांश क्षेत्र निर्यातक्षम द्राक्षांचे आहे, मोठा खर्च करून शेतकऱ्यांनी या बागा जीवापाड जपल्या आहेत. मात्र, आता अतिथंडीने घड सुकलेल्या बागांचे नुकसान शंभर टक्के आहे. त्याव्यतिरीक्त दिंडोरी तालुक्यात पालखेड धरण परिसर, मातेरेवाडी, आंबे, वरखेडा, लोखंडेवाडी, खडकसुकेणे; चांदवडच्या वडनेरभैरव, बहादुरी आणि धोंडगव्हाणवाडी येथेही मोठे नुकसान झाले आहे.
नाशिक जिह्यात द्राक्षबागांचे सुमारे दोन ते अडीच लाख एकर क्षेत्र आहे. यातील लेट सीजनच्या दोन लाख एकर बागांना हा फटका बसला आहे. या भागात द्राक्षमण्यांची फुगवण थांबल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.
निर्यातक्षम द्राक्षांचे मोठे नुकसान
अतिथंडीने द्राक्षमणी सुकल्याने शेतकऱयांसमोर काहीच पर्याय उरलेला नाही. आता आहे ते घड व बाग वाचविणे यालाच प्राधान्य आहे, अशी प्रतिक्रिया शिरवाडे वणी येथील प्रगतीशील शेतकरी किशोर निफाडे यांनी दिली.
सुक्ष्म अन्नद्रव्यांची फवारणी आवश्यक
अतिथंडीमुळे नाशिक जिह्यातील बहुतांश द्राक्षबागांमधील घडांची फुगवण थांबली आहे. त्यांची पोषणक्षमता कमी होऊ नये म्हणून तातडीची सुक्ष्म अन्नद्रव्यांची फवारणी करणे आवश्यक आहे, अशी माहिती द्राक्ष बागायतदार संघाचे विभागीय अध्यक्ष माणिकराव पाटील यांनी दिली. बागांचे तापमान नियंत्रित ठेवण्याकडे लक्ष दिले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.
निफाडचा पारा 4 अंशांवर
निफाडमध्ये गुरुवारी 1.8 अंश सेल्सिअस तापमान होते, येथे आज पारा 4 अंशावर पोहचला. नाशिकमध्ये किमान 6.9 व कमाल 23.9 तर, कळवणला किमान 3.4 व कमाल 28 अंश सेल्सिअस तापमान नोंदविले गेले.

































































