मुंबईत 26 अग्निशमन केंद्रे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन,मुंबई

टोलेजंग इमारतींमध्ये लागणारी आग विझवण्यासाठी 90 मीटर उंच हायड्रॉलिक प्लॅटफॉर्म, धगधगत्या आगीत  आगीवर नियंत्रण मिळवणारा रोबो, नवीन पदांच्या भरतीसह मुंबईत आणखी 26 नवीन अग्निशमन केंद्रे सुरू करणार असल्याचे पालिका प्रशासनाने आज स्थायी समितीत जाहीर केले. ही अग्निशमन केंद्रे कार्यान्वित झाल्यानंतर  आगीच्या दुर्घटनांवर नियंत्रण मिळवणे शक्य होणार आहे.

पालिकेच्या अग्निशमन दलात सध्या अनेक पदे रिक्त आहेत. शिवाय आगीवर नियंत्रण मिळवणे आणि कार्यालयीन कामे एकाच विभागामार्फत केली जात असल्यामुळे कामाचा प्रचंड ताण येत आहे. या पार्श्वभूमीवर अग्निशमन दलाचे अत्याधुनिकीकरण करण्याची मागणी शिवसेनेसह सर्वपक्षीय नगरसेवकांकडून केली जात आहे. या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासनाने अग्निशमन दलात आगामी काळात होणाऱ्या सुधारणांची माहिती स्थायी समितीत दिली. यामध्ये सध्या असलेल्या 34 अग्निशमन केंद्रांमध्ये आणखी  26 केंद्रे सुरू केली जाणार असून येत्या पाच-सहा वर्षांत यासाठी भूखंड मिळण्यासाठी विकास आराखडा ‘2014-2014’मध्ये कार्यवाही सुरू आहे. 2015च्या गोकुळ निवास दुर्घटनेनंतर स्थापन करण्यात आलेल्या सत्यशोधक समितीच्या अहवालानंतर छोटी 13 अग्निशमन केंद्रे सुरू करण्यात आल्याची माहितीही प्रशासनाकडून देण्यात आली.

अशी होतेय कार्यवाही

  • 2015 ते 2018 या कालावधीत 5658 इमारतींची तपासणी करण्यात आली असून 3018 इमारतींना अग्निशमन यंत्रणा नसल्याबद्दल नोटीस देण्यात आली. उपाहारगृहांवरील कारवाईत 1792 प्रकरणांत कारवाई करण्यात आली.
  • स्वतंत्र अग्निसुरक्षा पालन कक्षासाठी  24  विभागांत कार्यवाही अंतिम टप्प्यात. आग नियंत्रण आणि कार्यालयीन कामांसाठी स्वतंत्र विभाग.
  • दाटीवाटीच्या ठिकाणी मदतकार्य करण्यासाठी 17 जलद प्रतिसाद वाहने.
  • अग्निशमन दलाच्या मुख्य नियंत्रण कक्षाच्या अत्याधुनिकीकरणासाठी  इंटिग्रेटेड कंट्रोल अॅण्ड कमांड प्रणाली.