
मुंबईत अतिवृष्टीत होणाऱया संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी पालिकेने धोकादायक ठरणाऱ्या तब्बल 3 हजार 679 मॅनहोलवर मजबूत संरक्षक जाळय़ा बसवल्या आहेत. मुंबई शहर, पूर्व-पश्चिम उपनगरात ही कार्यवाही करण्यात आल्यामुळे दुर्घटना टळतील, असे अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांनी सांगितले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मॅनहोलच्या सुरक्षेबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश पालिकेला दिले होते.
पालिकेच्या माध्यमातून मुंबईत पावसाळापूर्व कामे वेगाने सुरू आहेत. अतिवृष्टीत पाणी तुंबलेले असल्यास मॅनहोलचा अंदाज येत नसल्याने दुर्घटना होण्याची शक्यता निर्माण होत असते. या पार्श्वभूमीवर पालिकेच्या माध्यमातून मॅनहोलवर मजबूत संरक्षक जाळय़ा बसवण्यात येत आहेत. शिवाय या संरक्षक जाळय़ा चोरीला जाऊ नयेत यासाठी साखळीने बांधून लॉक करण्यात येतात. लोखंडी मजबूत जाळय़ा समाजकंटकांकडून उखडून विकण्याचे प्रकार घडत असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.
परस्पर झाकण काढल्यास कारवाई
पावसाळय़ात काही वेळा समाजकंटकांकडून मॅनहोलवरील झाकणे काढल्याचे प्रकार घडतात. यामुळे दुर्घटना घडल्याचेही समोर आले आहे. तर काही वेळा अतिवृष्टीत नागरिकांकडून मॅनहोलचे झाकण काढले जाते. त्यामुळेही दुर्घटना होण्याची शक्यता निर्माण होते. त्यामुळे नागरिकांनी मॅनहोलवरील झाकणे स्वतःहून परस्पर काढू नयेत, असे आवाहन पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल, अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांच्याकडून करण्यात आले आहे. मॅनहोलकरील झाकण नागरिकांनी काढल्यास संबंधितांविरोधात कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही पालिकेकडून देण्यात आला आहे.
अशी झाली कार्यवाही
– मुंबई शहरासह पूर्व-पश्चिम उपनगरातील पावसाळय़ात धोकादायक ठरू शकणाऱ्या मॅनहोलचे सर्वेक्षण करून संरक्षक जाळय़ा आणि आवश्यक दुरुस्तीचे काम करण्यात आले. संपूर्ण मुंबईत मिळून 3 हजार 679 मॅनहोलकर झाकणाखाली संरक्षक जाळी लावण्यात आली आहे.
– मुंबई शहर विभागात 2 हजार 945, पूर्व उपनगरात 293 तर पश्चिम उपनगरात 441 मॅनहोलवर संरक्षित जाळय़ा लावल्या आहेत. शिवाय या ठिकाणी अतिवृष्टीत धोक्याचा इशारा देणारे फलकही लावण्यात येतात.

























































