नामांकित चार्टर्ड अकाउंटंटच्या कुंटुंबियांना जीवे मारण्याची धमकी देत मागितली 30 लाखांची खंडणी, पोलिसांनी आरोपीला केली अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नामांकित  चार्टड अकाउंटंटला व्हॉट्सअप कॉल करून कुंटुंबियांना जीवे मारण्याची धमकी देऊन 30 लाखांची खंडणी मागणार्‍या एकाला गुन्हे शाखेच्या युनिट दोनने अटक केली. किरण रामदास बिरादार (24, रा. उदगीर, मांजरी ) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.

गुन्ह्याच्या अनुषंगाने युनिट दोनचे वरिष्ठ पोलॊस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील यांनी टीम तयार केली होती. त्यानुसार तपास करण्यात येत होता. दरम्यान आरोपीने  व्हॉट्अप चॅटींग करून  फिर्यादीला 10 लाख रूपये, पीएमसी बिल्डीग व नंतर गरवाले कॉलेज येथे घेऊन येण्याबाबत मेसेज केला होता. त्याप्रमाणे पथक तयार करून पोलिसांनी सापळा लावला.

आरोपीने ठेवण्यास सांगितलेल्या ठिकाणी गरवारे ब्रिजजवळ बॅग ठवण्यात आली. यावेळी युनिट दोनचे कर्मचारी पाळत ठेवून होते.  आरोपीने बॅग घेतली व मोबाईल टाकून पळत असताना  पथकाने त्याला पाठलाग करून पकडले. नंतर त्यांच्याकडे नावाची विचारपूस करण्यात आली. त्याच्यावर स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार, सहआयुक्त संदीप कर्णिक,  अपर आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक क्रांतिकुमार पाटील, सहायक पोलीस निरीक्षक विशाल मोहिते, उपनिरीक्षक नितीन कांबळे, मोहसीन शेख, गजानन सोनुने, कादिर शेख, उज्ज्वल मोकाशी, नागनाथ राख यांनी केली