
सामना प्रतिनिधी,नागपूर
नॅशनल क्राइम रेकॉर्डच्या अहवालावरून रस्ते अपघात महाराष्ट्र देशात तिसऱ्या क्रमांकावर आहे. यंदाच्या वर्षात जानेवारी ते मार्च महिन्यांत राज्यात ९ हजार २४३ अपघात झाले. त्यात ३ हजार ३६१ जणांचा मृत्यू झाला. राज्यात शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात अपघातांचे प्रमाण अधिक आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत लेखी उत्तरात दिली.
राज्यातील रस्ते अपघातांबाबत आमदार अतुल भातखळकर आदींनी प्रश्न उपस्थित केला होता. रस्ते अपघातात देशात महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर आहे का असा प्रश्न होता. त्यावर नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोच्या अहवालानुसार २०१५ मध्ये रस्ते अपघातात महाराष्ट्र देशात तिसऱ्या क्रमांकावर असल्याचे आढळून आले होते. राज्यात २०१७ मध्ये ३५ हजार ८५३ अपघात झाले. त्यात १२ हजार २६४ जणांचा मृत्यू झाला तर २० हजार ४६५ जण जखमी झाले. जानेवारी ते मार्च २०१८ या कालावधीतील आकडेवारीनुसार शहरी भागातील अपघातांचे प्रमाण २७ टक्के असून मृत्यूचे प्रमाण १७ टक्के आहे तर ग्रामीण भागातील अपघातांचे प्रमाण ७३ टक्के असून मृत्यूचे प्रमाण ८३ टक्के असल्याची माहिती लेखी उत्तरात दिली.
मुंबई-गोवा महामार्ग अपघात
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर २०१४ ते मे २०१८ या कालावधीत रस्ते अपघातात ९३८ जणांचा मृत्यू झाला तर २ हजार ३२२ जण जखमी झाले. हे अपघात वाहनचालकांच्या निष्काळजीपणामुळे झाले आहेत. धोकादायक ओव्हरटेक, अविचाराने वाहन चालवणे, हयगय करणे, वाहन चालवताना दुर्लक्ष करणे अशा कारणांमुळे झाल्याचे लेखी उत्तरात नमूद केले.
ग्रामीण भागात अपघातांचे प्रमाण अधिक
शहरी भागात अपघातांचे प्रमाण २७ टक्के
ग्रामीण भागात अपघातांचे प्रमाण ७३ टक्के
राज्यात १ हजार ३२४ अपघातग्रस्त ठिकाणे
अपघातांची कारणे
चालकाचा निष्काळजीपणा
ओव्हरटेक
रस्त्याकडे दुर्लक्ष
वाहन चालवण्यात हयगय































































