सोन्याची तस्करी करण्यास वडिलांनी नकार दिल्याने अल्पवयीन मुलीचा विनयभंग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दुबई येथून मुंबईत येणाऱ्या एका व्यक्तीने सोन्याची तस्करी करण्यास नकार दिला म्हणून त्याच्या 17 वर्षीय मुलीचा चार जणांनी विनयभंग केल्याची धक्कादायक घटना मुंबईत घडली आहे. याप्रकरणी 17 वर्षीय मुलीचा विनयभंग, खंडणी, बदनामी आणि जिवे मारण्याच्या धमक्या दिल्याप्रकरणी एका महिलेसह चौघांवर गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुबईतून मुंबईत आल्यानंतर बॅगेत बेकायदेशीर सोने असल्याच्या भीतीने मुलीच्या वडिलांनी ती बॅग मुंबई विमानतळावर टाकून दिली होती. तेव्हापासून हे चार आरोपी अल्पवयीन मुलीचा छळ करत होते.

तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे मुलीचे वडील मुंबईला येत असताना दुबई विमानतळावर काही लोकांनी त्यांना एक बॅग दिली आणि मुंबईला घेऊन जाण्यास सांगितले. त्यांनी ओळखीच्या एका व्यक्तीचा संदर्भ दिल्याने मुलीच्या वडिलांनीही ती बॅग आपल्या सोबत घेतली. मात्र, मुंबईत आल्यानंतर या बॅगेत अवैध सोने तर नाही ना? या भीतीने त्याने ती मुंबई विमानतळावरच सोडून दिली.

19 ते 21 नोव्हेंबर दरम्यान उमर, जावेद, सय्यद पापा उर्फ ​​काफिया आणि समिना या चार जणांनी मुलीला घरी जाऊन धमकावले. दरम्यान उमर आणि समिना यांनीही एके दिवशी मुलीला रस्त्यात अडवून तिच्या शरीराला चुकीचा स्पर्श केला आणि तिचे केसही ओढले. यावेळी ”तुझ्या वडिलांनी आम्हाला सोने दिले नाही तर तुझे अपहरण करून खून करू” अशी धमकीही त्यांनी दिली, असे एफआयआरमध्ये म्हटले आहे.

यापैकी चौथी आरोपी काफियाने पीडित मुलीच्या वडिलांचा फोटो वापरून “सोना लेकर फरार” असा व्हॉट्सअ‍ॅप मेसेज तयार केला होता आणि तो फोटो व्हायरल देखील केला होता. दरम्यान आग्रीपाडा पोलिसांनी या चार आरोपींवर गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केला आहे. “आम्ही पीडित मुलीच्या दाव्यांची पडताळणी करत असून अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. असे पोलिसांचे म्हणणे आहे.