
उन्हाळ्यात अंगावर घामोळ्या, रेड रॅशेसची आणि इतरही त्वचाविकारांची समस्या निर्माण होते. घामामुळे दुर्गंधी, सतत अंग ओले राहणे यामुळे वारंवार आंघोळ करण्याची इच्छा होते. आंघोळीनंतर शरीर फ्रेश तर होतेच शिवाय बॅक्टेरिया आणि जंतूंपासून सुटका होते. काहीजणांना सतत अंघोळ करायला मिळते, असे नाही. याकरिता दिवसभर उत्साही, हलके आणि ताजेतवाने वाटावे, असे वाटत असेल तर आंघोळीच्या पाण्यात काही पदार्थ मिसळल्यास उत्साही राहालच शिवाय खाज येणे, घामोळ्या, अंगावर चट्टे उठणे यासारखे त्वचाविकारही दूर व्हायला मदत होईल.
कडूलिंब
कडुनिंबात अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात, जे त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. उन्हाळ्यात आंघोळीच्या पाण्यात कडुलिंबाची पाने किंवा कडुलिंबाचे तेल मिसळा. कडुलिंब किंवा त्याच्या तेलामुळे त्वचेवर खाज सुटणे, पुरळ येणे इत्यादी समस्येपासून आराम मिळेल. व दिवसभर उत्साही वाटेल.
हळद
हळदीमध्ये अनेक औषधी गुणधर्म आढळतात. त्यात अँटी-बॅक्टेरियल, अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटी-एजिंग सारखे अनेक गुणधर्म देखील असतात. ते पाण्यात मिसळून आंघोळ केल्यास, दिवसभर फ्रेश तर वाटेलच, यासह थकवा आणि खाज सुटणे इत्यादीपासून लगेच आराम मिळेल. याशिवाय पुरळ, मुरुम, टॅनिंग यासारख्या त्वचेच्या समस्याही दूर होतील.
गुलाबाच्या पाकळ्या
त्वचेसाठी गुलाबाच्या पाकळ्या किंवा गुलाबाचे पाणी फायदेशीर ठरते. आंघोळच्या पाण्यात एक किंवा 3० मिनिटांसाठी गुलाबाच्या पाकळ्या घालून ठेवा.अर्धा तासाने या पाण्याने आंघोळ करा. गुलाबाच्या पाण्याने आंघोळ केल्याने दिवसभर उत्साही वाटते. शिवाय मूडही चांगला राहातो. त्वचेच्या दुर्गंधीची समस्याही दूर होते.
बेकिंग सोडा
आपल्या त्वचेवर उन्हामुळे रेड रॅशेस किंवा इन्फेक्शन झाले असेल तर, बेकिंग सोड्याचा वापर करून पाहा. यासाठी एक कप गरम पाण्यात 2 चमचे बेकिंग सोडा मिसळून पेस्ट तयार करा. अर्धा तासानंतर हे मिश्रण आंघोळच्या पाण्यात मिसळून आंघोळ करा. यामुळे त्वचेची समस्या कमी होईल. उत्साह वाढायलाही मदत होईल.

























































