
सामना ऑनलाईन, ठाणे
मुरबाड तालुक्यातील रस्ते आता चकाचक होणार आहेत. विविध भागांतील जुन्या रस्त्यांचे डांबरीकरण व काँक्रीटीकरण करण्यात येणार असून त्यासाठी 40 कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील वाहतूक व्यवस्था सुधारणार असून विकासालादेखील चालना मिळेल. या कामाचा शुभारंभ आज करण्यात आला. मुरबाडमध्ये आता दर्जेदार रस्त्यांचे मजबूत जाळे विणले जाणार असून वाहनचालकांना व प्रवाशांना होणारा त्रासदेखील बंद होणार आहे.
ठाणे जिह्याच्या ग्रामीण भागातील रस्त्यांच्या कामासाठी शिवसेना नेते व पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रयत्नामुळे राज्य सरकार तसेच जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी मिळाला. त्यामुळे रस्त्यांची कामे आता सुसाट होतील. या कामाचे भूमिपूजन आज पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. जिह्याच्या ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेला चालना द्यायची असेल तर रस्त्यांचे जाळे मजबूत करावे लागेल.
मुरबाड हा जिह्यातील ग्रामीण भागाचा महत्त्वाचा दुवा असून येथील प्रश्न सोडवण्यासाठी आपण नेहमीच प्रयत्नशील असल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले. ग्रामीण भागातील रस्त्यांच्या मजबुतीकरणाची कामे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत करण्यात येणार आहेत. यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुभाष पवार, हातमाग महामंडळाचे अध्यक्ष व ग्रामीण जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
हे रस्ते होणार
– शिरवली, वडाची वाडी, फणसोळी- सुकाळवाडी.
– धसई – कळंबाड – मढ, रामपूर रस्ता.
– पारगाव ते बालकीचा पाडा.
– राज्य महामार्ग 79 ते पवाळे, कोळठण, भादाणे रस्ता.
– किसळ-धारगाव-संगम रस्ता.
– नांदगाव-मानिवली-ठुणे-पाडाळे रस्ता.
– पोटगाव-उंबरवाडी-चोण रस्ता.
– टेंबरे-बुद्रुक जोड रस्ता.




























































