कोल्हापूर जिह्यात 45 टक्के पेरण्या; बळीराजाला पुन्हा पावसाची प्रतीक्षा, नद्यांची पातळी खालावली

गेल्या तीन-चार दिवसांपासून जिह्यात पावसाचा जोर कमी झाल्याने नद्यांच्या पाणीपातळीतही मोठी घट झाली आहे. दोन दिवसांत पंचगंगेच्या पाणीपातळीत तब्बल दहा ते बारा फुटांची घट झाली आहे. दोन दिवसांपूर्वी पंचगंगा आणि भोगावती नदीवरील पाण्याखाली गेलेले नऊ बंधारे मोकळे झाले असून, वाहतूक पूर्ववत सुरू झाली आहे. दरम्यान, जिह्यात सुमारे 40 ते 45 टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. आता पुढील पेरणी होण्यासाठी बळीराजा पुन्हा एकदा पावसाच्या प्रतीक्षेत आहे.

यंदा जूनच्या अखेरपर्यंत पावसाने प्रतीक्षा करायला लावली. नद्या आणि धरणाने तळ गाठल्याची स्थिती निर्माण झाली असतानाच गेल्या आठवडय़ात दमदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे धरणांत 25 ते 60 टक्के पाणीसाठा झाला. पावसाला सुरुवात झाल्याने शेतकऱयांनी पेरण्या करण्यास सुरुवात केली. आतापर्यंत जिह्यात सुमारे 40 ते 45 टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. मात्र, गेल्या चार दिवसांपासून पावसाने पाठ फिरविल्याने शेतकरी चिंतातुर झाला असून, बळीराजाला पावसाची प्रतीक्षा आहे. आठवडाभरापूर्वी पडलेल्या पावसावर बळीराजाने धोका पत्करून सोयाबीन, भुईमूगसह पेरणी केलेली पिके तरारून येत असताना, या पिकांना हवा असणारा दमदार पाऊस अद्याप झालेला नाही. आता दररोज पडणाऱया कडक उन्हामुळे शेतकरी चिंतेत पडला आहे.

गेल्या वर्षी जिह्यात 1 लाख 97 हजार हेक्टरपैकी 1 लाख 73 हजार हेक्टरवर पेरणी पूर्ण झाली होती. यंदा अवघ्या 75 हजार 838 हेक्टरवर भात, सोयाबीन, ज्वारी, भुईमूग आणि नाचणी या पिकांची पेरणी झाली आहे. जिह्यात एकूण 39 हजार 500 हेक्टर क्षेत्रांवर भात पिकाची लागण पूर्ण झाली आहे. एकूण पिकाच्या क्षेत्रांपैकी 42 टक्के भाताची पेरणी पूर्ण झाली आहे. नाचणीची 836 हेक्टरवर पेरणी झाली आहे. सोयाबीन 17 हजार 568 हेक्टर, भुईमूग 14 हजार 992 हेक्टर, भुईमूग 40 टक्के क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे. उगवलेल्या पिकासाठी सलग आठ ते दहा दिवस संततधार पावसाची गरज आहे. नाही तर दुबार पेरणीचे संकट येणार आहे.

शेवगावात 61 टक्के पेरणी पूर्ण
तालुक्याकडे गेल्या 10-12 दिवसांपासून पावसाने पाठ फिरविल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. गेल्या महिन्यात तालुक्याच्या विविध मंडळांत पावसाने हजेरी लावल्यानंतर खरीप पेरणीला वेग आला होता. त्यामुळे तालुक्यात खरीप हंगामाचे उद्दिष्ट 84 हजार 902 हेक्टर क्षेत्र असून, तालुक्यात आजअखेर 56 हजार हेक्टर म्हणजे उद्दिष्टाच्या सुमारे 61 टक्के पेरणी झाल्याची माहिती तालुका कृषी कार्यालयातून सांगण्यात आली.

यंदा 42 हजार हेक्टरवर कपाशी लागवड झाली आहे. तूर 7 हजार 300 हेक्टर, सोयाबीन 85, उडीद 45, मूग 34 आदी पिकाची पेरणी झाली आहे. सध्या या पिकांना पावसाची अत्यंत गरज आहे.