
सामना ऑनलाईन, नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातल्या प्रत्येक गावात वीज पोहोचल्याचे जाहीर केले होते. पण केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाच्या अहवालानुसर देशात अजून ५ हजार गावांत वीज पोहोचली नसल्याचे नमूद केले आहे. या अहवालानुसार प्रत्येक राज्यातील काही गावात विद्युतीकरण झालेले नाही. व्यवस्थेतील दोष आणि कर्मचार्यांच्या बेपरवाईमुळे हे काम अर्धवट राहिल्याचे अहवालात म्हटले आहे.
या गावात लवकर वीज पोहोचवण्यासाठी प्रयत्न चालू असल्याचे या अहवलात सांगितले आहे. मंत्रलायाच्या आकडेवारीनुसार उत्तर प्रदेशमधील सर्वाधिक गावात वीज पोहोचली नाही. त्यांची संख्या १०४४ इतकी आहे. त्यानंतर ओडिशा आणि बिहार राज्यांचा क्रमांक लागत. या राज्यांतील अनुक्रमे ६६६ आणि ५३३ गावांत वीज पोहोचलेली नाही. ग्रामीण विकास मंत्रालयाने तासानुसार वीज पुरवठा होणार्या गावांची विभागणी केली आहे. १-४ तास वीज पुरवठा होणार्या गावांची संख्या ही ६५८६ इतकी आहे. तर ५-८ तास वीज पुरवठा होणार्या गावांची संख्या १४६२ इतकी असून ९-१२ तास वीज पोहोचणार्या गावांची संख्या ही ३७१६८ इतकी आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एप्रिल महिन्यात संपूर्ण देशात वीज पोहोचली असल्याचे जाहीर केले होते. केंद्र सरकारने दीनदयाळ उपाध्याय ग्राम ज्योति योजनेच्या अंतर्गत देशातील सर्व गावात वीज पुरवठा करण्यास सुरूवात केली होती. परंतु ग्रामीण विकास मंत्रालयाच्या नुकत्याच जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार यात गडबड दिसत आहे. सिम्बॉयसिस संस्थेमधील ग्रामीण विकास विषयाचे तज्ज्ञ पल्लभ भट्टाचार्य यांनी हा आकडा ५००० नसून १३००० असल्याची शंका वर्तवली आहे.

























































