
सामना प्रतिनिधी । नागपूर
लहान मुलांनी त्याच्या आईवडील, भावासोबत राहिले पाहिजे. स्पर्धेच्या नादाला लागून पाचव्या वर्षी पहिलीला प्रवेश देणे योग्य नाही. मुलांना घराबाहेर काढण्याची घाई का करत आहोत, असा सवाल करत शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सहाव्या वर्षीच पहिलीचा प्रवेश होईल असे विधान परिषदेत स्पष्ट केले.
पहिलीचा प्रवेश सहा वर्षांऐवजी पाच वर्षे केल्यास एनडीए प्रवेशासाठी फायदा होईल असे हेमंत टकले यांनी सांगितले, तर स्पर्धा महत्त्वाची आहे पण सहाऐवजी पाचव्या वर्षी मुलांना शाळेत प्रवेश दिल्यास त्यांच्या मानसिकतेचा विचार करावा. त्यांचा बळी जाऊ नये याकडे नागो गाणार यांनी लक्ष वेधले. आमदार दत्तात्रेय सावंत यांनी नियम ९७ अन्वये अल्पकालीन चर्चेद्वारे शाळा प्रवेशासाठीचा मुद्दा चर्चेला आणला. तावडे म्हणाले, आरटीई कायद्यानुसार सहाव्या वर्षी प्रवेश मिळणे योग्य आहे. निती आयोगाचे मानांकन यावरूच ठरते, त्याचे फायदे मिळतात. महाराष्ट्रात पहिलीच्या प्रवेशासाठी सहा वर्षांचा नियम कायम असेल.
घरातील फूल घरात राहू द्या
‘घर को सजाने के लिए नर्सरीसे फूल ले के आए’
‘और घर के फूल नर्सरी भेज दिए’
या शायरीचा आधार घेत. घरातील फुलासारखी लहान मुले घरात राहू द्या. त्यांच्या भावना, शरीर, मन याचा विचार करा, असे तावडे यांनी सांगितले.

























































