कोयना धरणाच्या सहा वक्री दरवाजातून 77 हजार 386 क्युसेक्स प्रतिसेकंद पाणी कोयना नदीपात्रात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । संगमेश्वर

कोयना धरण परिसरात पावसाचा जोर काही प्रमाणात वाढल्याने आवकही वाढली आहे. त्यामुळे शुक्रवारी दुपारी महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असणाऱ्या कोयना धरणाचे सहा वक्री दरवाजे 8 फुटांवरून 1 फूट वाढवून 9 फुटांवर करण्यात आले आहेत. त्यामुळे कोयना नदीच्या पाणी पातळीत पुन्हा वाढ होणार आहे. सद्या धरणात 89 हजार 386 क्युसेक्स प्रतिसेकंद पाण्याची आवक होत असून 103.19 टीमसी पाणीसाठा झाला आहे. तर वक्र दरवाज्यातून 77 हजार 386 क्युसेक्स प्रतिसेकंद पाणी कोयना नदीपात्रात सोडले जात आहे.

दरम्यान, अद्याप कोयना धरण परिसरात असून मधुन पावसाच्या जोरदार सरी कोसळत असून धरणातील येणारी पाण्याची आवक आणि पावसाचे प्रमाण लक्ष्यात घेता वक्र दरवाजे कमी-जास्त केले जातील, अशी माहिती कार्यकारी अभियंता कुमार पाटील यांनी दिली.गेल्या पंधरा दिवसापासून कोयना धरण परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे 105.25 टीमसी पाणीसाठवन क्षमता असणारे धरण काठोकाठ भरल्याने रविवारपासून धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. अगदी 3 फुटांपासून ते 16 फुटांपर्यंत गेट उघडल्याने नदीकाठावरील अनेक गावांत पूरपरिस्थिती निर्माण होऊन जनजीवन विसकळीत झाले होते. दिवसाचे प्रमाण काही कमी होत नव्हते त्यामुळे धरणातील आवकही वाढतच होती.

मंगळवारी दुपारी चार वाजता गेट साडेचौदा फुटांवरून दीड फुटाने वाढवत 16 फुटांवर नेण्यात आले होते. त्यानंतर सुमारे 15 तास धरणाचे दरवाजे स्थिर ठेवण्यात आले होते. मात्र दरम्यानच्या कालावधीत पावसाचा जोर ओसरल्याने बुधवारी धरणाचे दरवाजे सकाळी 11 वाजता दोन फुटांनी कमी करून ते चौदा फुटांवर नेण्यात आले होते. त्यावेळी 1 लाख 6 हजार 990 क्युसेक पाण्याचा प्रतिसेकंद विसर्ग वक्री दरवाजातून तर पायथा वीजगृहातून 2 हजार 100 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू होता.

धरणाचे दरवाजे कमी करण्यात आल्याने पुराचे पाणी चार फुटाने कमी झाल्याने आणि पावसाचा जोर काही प्रमाणात ओसरल्याने नदीकाठच्या गावातील लोकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला होता. मात्र सायंकाळी 6.30 वाजता धरणाचे दरवाजे पुन्हा 16 फुटांवर नेण्यात आले. यावेळी धरणातून कोयना नदीत प्रतिसेकंद 1 लाख 21 हजार 723 तर पायथा वीजगृहातून वीज निर्मिती करून प्रतिसेकंद 2 हजार 100 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत होता. बुधवारी रात्रीपासून कोयना पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कमी झाल्याने धरणाचे दरवाजे गुरुवारी सकाळी 13 फूट नंतर 10 फूट आणि आता 8 फुटांवर स्थिर ठेवण्यात आले होते.

मात्र शुक्रवारी कोयना धरणातील आवक पुन्हा वाढल्याने दुपारी 3 वाजता वक्र दरवाजे 1 फुटाने वाढऊन 9 फुटांवर करण्यात आले आहेत. सद्या कोयना धरणात एकूण 103.19टीमसी पाणीसाठा झाला असून पाणी पातळी 2161.11 फूट इतकी झाली आहे. सद्या धरणात 89 हजार 386 कुसेक्स पाण्याची आवक होत असून 77 हजार 387 कुसेक्स पाण्याचा नदी पत्रात विसर्ग करण्यात येत आहे. दरम्यान गेट आणखी एका फुटाने वाढवल्याने कोयना नदीच्या पाणी पातळीत वाढ होणार आहे. तर कोयना नदीवरील मुळगावं पूल आणि मोरगिरी विभागाला जोडणाऱ्या दोन्ही पुलावर पाणी असल्याने वाहतूक बंद झाली आहे.