
पाच वर्षांपूर्वी एका 80 वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी कर्नाटक येथील न्यायालयाने 30 वर्षीय व्यक्तीला 10 वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. 5 जून 2017 रोजी शिवमोग्गा शहरातील इरफान याने तामिळनाडूमधील 80 वर्षीय वृद्धेवर बलात्कार केला होता. याप्रकरणी त्याला दोषी ठरविण्यात आले. इरफान पोल्ट्री फार्ममध्ये काम करत होता. त्याने उडीपी जिल्ह्यातील थेंकपेटेजवळ हे कृत्य केले. याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश दिनेश हेगडे यांनी गुरुवारी त्याला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आणि 50,000 रुपये दंड ठोठावला. तर आयपीसीच्या कलम 506 अन्वये दोषी ठरवून त्याला 5 हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.
या घटनेनेनंतर वृद्ध महिलेला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिच्या जबाबावरून पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला. नंतर तपासादरम्यान पोलिसांना सापडलेल्या छायाचित्रावरून महिलेने आरोपीला ओळखले. बलात्कार केल्यानंतर त्याने या वृद्ध महिलेकडील 30 हजार रुपये व सोने देखील चोरले. त्यानंतर त्याने घटनास्थळावरून पळ काढला. पोलिसांनी सांगितले की, इरफान हा बेंगळुरूच्या ब्यातरायणपुरा येथे झालेल्या एका खून प्रकरणातील आरोपी आहे.


























































