
सामना प्रतिनिधी । मुंबई
भायखळा तुरुंगातील महिला कैदी मंजुळा शेट्ये हिच्या हत्येप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तुरुंगातील सहा पोलीस कर्मचाऱ्यांविरुद्धच्या खटल्याला मुंबई सत्र न्यायालयात गुरुवारपासून सुरुवात झाली. अतिरिक्त सत्र न्यायाधीश शायना पाटील यांच्यासमोर सुरू झालेल्या या खटल्यात फिर्यादी पक्षाने गुरुवारी पहिल्या साक्षीदार हजर करून त्यांची सरतपासणी घेतली. सरतपासणीदरम्यान विशेष सरकारी वकील विद्या कासले यांनी या साक्षीदाराला अनेक महत्त्वाचे प्रश्न विचारले.
जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या मंजुळा शेट्ये हिला 23 जून 2017 रोजी भायखळा तुरुंगात जबर मारहाण करण्यात आली होती. त्यातच तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी तुरुंगातील 6 कर्मचाऱ्यांविरुद्ध खुनाचा खटला भरण्यात आला आहे. या घटनेच्या तपासात साह्यभूत ठरणारा भायखळा तुरुंगाचा नकाशा काढणाऱ्या साक्षीदाराला सर्वप्रथम साक्षीसाठी पाचारण करण्यात आले होते. या साक्षीदरम्यान त्याने तुरुंगातल्या ‘लेआऊट’संदर्भातील माहिती न्यायाधीशांना करून दिली.
बचाव पक्षाला तुरुंगाची पाहणी करायचीय
दरम्यान, या साक्षीदाराची उलटतपासणी करण्यापूर्वी बचाव पक्षाच्या वकिलांनी तुरुंगाची पाहणी करण्याची मागणी केल्याने या प्रकरणाची सुनावणी 28 नोव्हेंबरपर्यंत तहकूब करण्यात आली. तुम्हाला तुरुंगाची पाहणी करायची असेल तर तुम्ही तुरुंग अधीक्षकांकडे तशी रीतसर परवानगी मागा, असेही न्यायाधीश पाटील यांनी बचाव पक्षाच्या वकिलांना सांगितले.


























































