
सामना प्रतिनिधी । नवी दिल्ली
देशभरात ‘मी टू’ मोहिमेचे वादळ उठले आहे. या पार्श्वभूमीवर हरीयाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांचा व्हिडीओ व्हायरल झाला असून त्यात त्यांनी बलात्काराच्या घटनांसाठी महिलांना जबाबदार ठरवले आहे. प्रेमप्रकरणात वाद झाला की ‘त्या’ महिला बलात्काराची बोंब ठोकतात असे वादग्रस्त वक्तव्य खट्टर यांनी केले आहे.
पंचकुला येथील कार्यक्रमात बोलताना खट्टर यांची जीभ घसरली. ते म्हणाले, बलात्काराच्या घटनांमध्ये वाढ झालेली नाही. अशा घटना याआधीही होत होत्या. मात्र 80 ते 90 टक्के प्रकरणांमध्ये भलतेच काहीतरी घडते. पुरुष आणि स्त्री प्रेम करतात, पण जेव्हा वाद होतो तेव्हा ती महिला पोलिसांत जाते आणि बलात्काराची तक्रार दाखल करते.
खट्टर यांनी माफी मागावी
खट्टर यांनी महिलांचे चारित्र्यहनन केले असून त्यांनी माफी मागावी अशी मागणी काँग्रेसने केली आहे. खट्टर यांच्या या वक्तव्यामुळे भाजपचे विचार किती गलिच्छ आहेत हे दिसून येते अशी टीका काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी केली आहे.




























































