अल्पवयीन भाचीवर काकाकडून बलात्कार करून खून, पोलिसांकडून अटक  

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
फोटो- प्रातिनिधिक

सामना प्रतिनिधी । पुणे

भूक लागल्याचा बहाणा करून घरामध्ये घुसून मावशीच्या नवर्‍यानेच अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सिंहगड पोलिसांनी या प्रकरणी आरोपी नराधमाला अटक केली. ३० वर्षीय नराधम हा भैरवनाथ मंदीराजवळ रहायला आहे. तो रिक्षा चालविण्याचे काम करतो. धायरेश्वर मंदिराच्या जवळ एका सोसायटीमध्ये पीडित कुटूंबीय रहायला आहे. हे कुटूंब मुळचे बार्शी येथील असून, गेल्या दोन वर्षांपासून ते पुण्यात आहेत.

गुरूवारी कॉलेज संपल्यानंतर दुपारी घरी एकटी असताना साडे तीनच्या सुमारास हा नराधम पीडितेच्या घरात आला. त्याने पीडित मुलीला जेवायला वाढायला सांगितले. ती स्वयंपाक घरात ताट वाढून घेत असताना त्याने तिला पाठीमागून जाऊन पकडले. तिने आरडाओरडा करून त्यास विरोध केला, त्यावेळी तिचा जोरात गळा दाबल्याने ती बेशुद्ध पडली. तिला हॉलमध्ये आणुन खाली गोधडीवर झोपवून तिच्यावर अत्याचार केले. ती शुद्धीवर येत असल्याचे लक्षात येताच त्याने ओढणीने तिचा गळा आवळून ठार मारून पुन्हा अत्याचार केले.

याचा कोणालाही संशय येऊ नये म्हणून त्याने तिला पलंगावर झोपवले, तिचे केस, कपडे व्यवस्थित केले. सायंकाळी साडे पाचच्या सुमारास तिचा भाऊ शाळेतून परत आल्यानंतर तिला झोपेतून उठविण्याचा प्रयत्न केला. ती उठत नसल्याने घाबरून जाऊन त्याने शेजार्‍यांना ही माहिती दिली. त्यानंतर तिला रूग्णालयात दाखल केले. रात्री उशीरा ससून रूग्णालयातील डॉक्टरांनी धायरी येथील एका मुलीचा मृतदेह रूग्णालयात आला असल्याची माहिती दिली.

सिंहगड पोलिसांनी मुलीचा मृतदेह पाहिल्यानंतर व घराची झडती घेतल्यावर त्यांना तेथे काही संशयास्पद वाटले नाही. शुक्रवारी दुपारी दीडच्या सुमारास शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर त्यात तिचा गळा दाबून व बलात्कार करून खून केल्याचे स्पष्ट झाले. यानंतर एकच खळबळ उडाली.

पोलीस दलातील वरिष्ठ अधिकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली. सिंहगड रस्ता पोलिसांनी व गुन्हे शाखेने त्यांचे शेजारी, मुलीचे वर्गातील मैत्रिणी, मित्रांकडे चौकशी केली, मोबाईल तपासला परंतू, त्यांच्याकडून काहीच माहिती मिळाली नाही. सिंहगड पोलिसांनी त्यांच्या सोसायटीजवळील एक सीसीटीव्ही तपासला, त्यातील एक व्यक्ती संशयास्पद वाटला. त्याची माहिती काढली असता, हा व्यक्ती तिचा मावशीचा नवरा असल्याचे समोर आले. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत तो मान्य करत नव्हता. परंतू, पोलिसी खाक्या दाखवताच त्याने बलात्कार करून खून केल्याची कबुली दिली.

भांडणांमुळे घरी जाणेयेणे होत बंद 

या नराधमाची पत्नी दुसर्‍यांदा गरोदर आहे. तो तिला दारू पिऊन मारहाण करत असल्याने त्याला समजविण्यासाठी पीडित मुलीचे आई वडील त्याच्या घरी गेले असता त्याने त्यांच्याशी भांडण करून मारहाण केली होती. त्यामुळे नराधमाचे घरी जाणेयेणे बंद होते.  गुरूवारी दुपारी हा नराधम आचानक घरी आला, त्यावेळी पीडितने तु घरी कसा काय आला? असे विचारले. त्यावेळी त्याने मला खुप भुक लागली आहे जेवायला वाढ असे सांगितल्याने तिने त्याला घरात घेतले. त्यानंतर या नराधमाने तिच्यावर अत्याचार करून खून केला.