
सामना ऑनलाईन। मुंबई
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. पण यावेळी ही चर्चा त्यांच्या गाण्यावर, पेहरावावर किंवा अभिनयावर नसून चक्क त्यांच्या नृत्यकौशल्यावर रंगली आहे. एका कौटुंबीक सोहळ्यात अमृता यांनी बाजीराव- मस्तानी चित्रपटातील ‘मैं दिवाणी हो गयी’ या गाण्यावर सुंदर नृत्य सादर केलं. यामुळे गाण्याबरोबरच अमृता या नृत्यातही पारंगत असल्याचं समोर आलं .त्यांचे नृत्य बघून नेटकरीही भारावले असून त्यांनी अमृता यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.
अमृता यांनी फेसबुक आणि इन्सटाग्राम अकाऊंटवर डान्सचा हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. शेकडो लोकांनी तो पाहिला असून अनेकांनी त्यांच्या नृत्याला दाद दिली आहे.
अमृता मुख्यमंत्र्याच्या पत्नी असल्याने त्यांच्या प्रत्येक हालचालींवर मीडियाचे लक्ष असते. यामुळे त्यांची सोशल मीडियावर चर्चाही असते. काही महिन्यांपूर्वी त्यांनी सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्यासोबत गायलेल्या गाण्याचा व्हिडीओ सोशल साईटवर पोस्ट केला होता. त्यावेळी त्या चर्चेत आल्या होत्या. त्यानंतर काही दिवसांपूर्वी त्यांनी मुंबई -गोवा बोट उद्घाटनावेळी डेकवर बसून सेल्फी घेतला होता. त्यावेळीही त्यांच्यावर अनेकांनी टीका केली. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमृता यांना पूर्ण स्वातंत्र्य असल्याचं सांगत त्यांची पाठराखण केली होती.





























































