
धनेश पाटील ,[email protected]
कथ्थक या शास्त्रीय नृत्याच्या जोडीने साल्सा या पाश्चिमात्य नृत्यकलेवर चांगलीच पकड मिळवून महाराष्ट्राचा ‘नच बलिये’ या नृत्यस्पर्धेत उपविजेतेपद पटकावलेला तर अनेक सिनेमे, नाटक आणि मालिकांतून आपल्या अभिनयाची वेळोवेळी चुणूक दाखवलेला हरहुन्नरी कलाकार म्हणजे नकुल घाणेकर. रत्नाकर मतकरी लिखित आणि दिग्दर्शित ‘आरण्यक’ या सध्या रंगभूमीवर तुफान गाजलेल्या नाटकातून नकुलने अभिनयाच्या जोरावर रसिकांवर मोहिनी घातली आहे.
नकुलचं जन्मगाव मुंबई. वयाच्या अवघ्या सातव्या वर्षी नकुल ठाण्यात स्थायिक झाला. सुरुवातीचं शालेय शिक्षण बीएआरसीच्या शाळेत झाल्यानंतर ठाण्यातल्या ए. के. जोशी विद्यालयातून शालेय शिक्षण पूर्ण करत पुढे रुईया महाविद्यालयातून मायक्रोबायोलॉजी हा विषय घेऊन विज्ञान शाखेची पदवी त्याने मिळवली. पुढे एमएससीचे पदव्युत्तर शिक्षणदेखील त्याने मुंबई विद्यापीठातून पूर्ण केलं. शिक्षणाची ही शिदोरी गाठीशी जोडत असतानाच नकुलने ठाण्यात आल्या आल्या नृत्याचेदेखील धडे गिरवण्यास सुरुवात केली.
वयाच्या सातव्या वर्षी नकुल दाखल झाला तो गुरू डॉ. राजकुमार केतकर यांच्याकडे. सुमारे सात वर्षे नृत्याचे मूलभूत धडे गुरू केतकरांकडे गिरवल्यानंतर नकुलने शास्त्रीय नृत्याकडून आपलं लक्ष वळवत पाश्चिमात्य नृत्याच्या दिशेने आपला प्रवास सुरू केला. सुप्रसिद्ध अशा गुरू राजेश गमरे यांच्याकडे पाश्चिमात्य नृत्याचे धडे घेण्यास नकुलने सुरुवात केली. त्यानंतर नृत्य दिग्दर्शक गुरू डॅरेन दास तर याच गुरूचे सहायक असलेले गुरू इम्रान खान यांच्याकडे त्याने पाश्चिमात्य नृत्यकलेचे धडे गिरवले. जॅझ, हिप हॉप, कंटेपररी आणि एकूणच फ्री स्टाईलच्या नृत्याचे धडे मिळवलेल्या नकुलने देशभरात याच समूहासोबत कार्यक्रम करण्यास सुरुवात केली होती.
कथ्थक या शास्त्रीय नृत्याकडून पाश्चिमात्य नृत्याकडे वळलेल्या नकुलने अनेक वर्षांनंतर पुन्हा कथ्थक नृत्याच्या दिशेने आपली पावलं वळवली अन् गुरू केतकरांकडे शालेय काळत शिकलेल्या नकुलने पुन्हा कथ्थकचे पुढचे शिक्षण घेण्यास सुरुवात केली ती गुरु सोनिया परचुरे यांच्याकडे. नकुलने कथ्थक विशारद तसंच गांधर्व विद्यालयातून नृत्य अलंकाराची पदवीदेखील मिळवली. कृष्ण या कथ्थक विषयावर काम करण्याची संधी त्याला प्राप्त झाली आणि हा विषयच त्याच्यासाठी टर्निंग पॉइंट ठरला. याच काळात त्याने साल्सा या पाश्चिमात्य नृत्य प्रकाराचाही अभ्यास करण्यास सुरुवात केली होती. गुरू रौनक, गुरू आनंद मुझुमदार, गुरू के. पी. नंबियार, सिंगापूर इथले गुरू गिप्सन पिअर तसचं युनायटेड स्टेट इथल्या तीन ते चार गुरूंकडून नकुलने या पाश्चिमात्य नृत्याचे धडे गिरवले होते.
नकुलने नृत्याचे कार्यक्रम देशभरातल्या जवळ जवळ सर्वच महत्त्वाच्या शहरांत केले असून त्याचे कार्यक्रम न्यूझीलंड, लंडन, न्यूयॉर्क, चीन इथेही आयोजित करण्यात आले आहेत. नृत्याचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी नकुलने ठाण्यात ‘डिफरंट स्ट्रोक्स’ या नावाने संस्थाही सुरू केली असून स्वतः नकुल या संस्थेत नृत्य शिकवतो. शिवाय हिंदुस्थानातल्या टॉप थ्री नृत्य दिग्दर्शकांपैकी एक असलेला नकुल याच संस्थेच्या माध्यमातून नवोदितांना मार्गदर्शन करीत आहे हे विशेष.
नकुलने नृत्यासोबत अभिनय क्षेत्रातही आपला वेगळा ठसा उमटवला आहे. नृत्य आणि अभिनय असा समांतर यशस्वी प्रवास त्याने आजवर करत दोन्ही क्षेत्रांत आपले तितकेच वेगळे स्थान जपले आहे हेदेखील तितकेच महत्त्वाचे. महाराष्ट्राचा ‘नच बलिये’मध्ये क्रांती रेडकर ही त्याची जोडीदार होती अन् याच स्पर्धेत त्याने उपविजेतेपद पटकावलं होतं. त्याने ‘जय मल्हार’, ‘अस्मिता’, ‘अनोळखी’, ‘अजूनही चांद रात आहे’ या मालिकांत तसेच केदार शिंदेंच्या ‘ऑन डय़ुटी चोवीस तास’, ‘प्रतिबिंब’, ‘सामर्थ्य’, ‘संघर्ष’ या सिनेमांत अभिनय सादर केला आहे. ‘तुझ्यासाठी प्रिया रे’, ‘कृष्ण’, ‘अज्ञात झऱयावर रात्री’ या नाटकांत त्याने महत्त्वाची भूमिका साकारली. सध्या नकुल ‘आरण्यक’ या नाटकांच्या दौऱयात व्यस्त असून या नाटकाने दर्दी प्रेक्षकांची विशेष गर्दी खेचल्याच चित्र महाराष्ट्रात आहे.
अभिनयासाठी नकुलला ‘झी’ मराठीचा पदार्पणाचा पुरस्कार तसेच रोट्रक्ट क्लबचा युथ एक्सलन्स अवॉर्ड लाभला आहे. नृत्य आणि अभिनय या दोन्ही क्षेत्रांत वेगाने, मात्र अभ्यासपूर्ण प्रवास करणाऱया नकुलचा पोर्टफोलिओ करण्याची मला संधी मिळाली. त्याच्या आगामी सिनेमासाठीच हे विशेष पोर्टफोलिओ शूट होतं. शूटच्या वेळी विविध पात्रं रंगवून नकुलचं आम्ही फोटोशूट केलं. रंगमंचावर लीलया वावरणारा नकुलचा आत्मविश्वास फोटोशूटच्या वेळी तितकाच दांडगा होता.
























































