
>> नीलेश कुलकर्णी
‘मी तुझी आत्या नाही’ अशा शब्दांत बसपाच्या सर्वेसर्वा मायावतींनी समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांना फटकारण्यास फार काळ लोटलेला नाही. मात्र गेल्या काही वर्षांत गंगेच्या पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आणि एकमेकांची तोंडेही न पाहणाऱ्या मायावती व अखिलेश यांनी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आघाडी केली. हे दोन्ही पक्ष लोकसभेच्या प्रत्येकी 38 जागा लढविणार आहेत. थोडक्यात उत्तर प्रदेशात सपा-बसपा यांनी ‘तुमचं आमचं जमलं’ असा नारा दिला आहे. त्यामुळे भाजपच्या मोदी-शहा जोडीचे मात्र ‘घडलंय बिघडलंय’ अशी परिस्थिती होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
मागील लोकसभा निवडणुकीत मी तुमच्यापैकीच एक ‘ओबीसी’ आणि ‘मां गंगा ने बुलाया है’ असे म्हणत पंतप्रधान मोदी यांनी उत्तर प्रदेशात दणदणीत यश मिळवून पंतप्रधानपदाचा सोपान गाठला होता. उत्तर प्रदेश व बिहारसारख्या राज्यांत अजूनही जातीपातीवर मतदान होते. त्याला अपवाद ठरली 2014 ची लोकसभा निवडणूक. मोदी नावाचा भला माणूस देशाचे काहीतरी भले करील या आशेपोटी उत्तर प्रदेशातील जनेतेने जातपात, धर्म विसरून मोदींना, म्हणजे भाजपला भरभरून मतदान केले. मात्र गेल्या साडेचार वर्षांत जनतेच्या आशाआकांक्षाचे गाठोडे गंगेमध्ये विसर्जीत झाले आहे. त्यात योगी आदित्यनाथ यांच्या हाती उत्तर प्रदेशसारखे संवेदनशील राज्य दिले गेले. या योगी आदित्यनाथ यांनी जातीयवादाचा कळस गाठत ज्या पद्धतीने कारभार हाकला त्यामुळे क्षुब्ध होत भाजपचा परंपरागत मतदार असलेल्या ब्राह्मणांनी संघर्षाच्या मुठी आवळल्या आहेत. दलितांवर अत्याचार होत आहेत. पोलीस मारले जात आहेत. अशा परिस्थितीत मायावती व अखिलेश यांची झालेली आघाडी ही मोदी-शाह जोडींची झोप उडवणार हे निश्चित. ‘गुरू-चेल्यां’ना आम्ही धडा शिकवू अशी गर्जनाच मायावतींनी केली आहे. काही वर्षांपूर्वी गेस्टहाऊसमध्ये आपल्याला कोंडून जिवंत मारण्याचा प्रयत्न समाजवादीच्या कार्यकर्त्यांनी केल्याचा आरोप करणाऱ्या मायावतींनी आता त्याच समाजवादी पक्षाशी आघाडी केली आहे. अर्थात, या आघाडीमागे या दोन्ही पक्षांचा राजकीय स्वार्थ आहे हे उघड आहे. मात्र त्याचवेळी योगी आदित्यनाथ यांच्या कारभारामुळेदेखील या दोघांनी एकत्र येण्याचा मार्ग सुकर झाला आहे. किंबहुना या आघाडीचे श्रेय मुख्यमंत्री योगींनाच द्यायला पाहिजे. मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर काही काळ देशातील विरोधक ‘आपण मोदींना हरवू शकतो’ हेच विसरून गेले होते. मात्र योगींनी उत्तर प्रदेशात इतका ढिसाळ कारभार केला की मोदींना पराभूतच नाही तर नेस्तनाबूत करता येऊ शकते हा अनमोल संदेश गोरखपूर व फुलपूरच्या लोकसभा पोटनिवणुकांनी दिला. या निवडणुकांनंतर भाजपची देशभरात जी घसरगुंडी सुरू आहे ती थांबायला तयार नाही. त्या अर्थाने योगी हेच ‘आत्या-भाच्या’च्या आघाडीचे आणि देशभरातील महागठबंधनचे ‘प्रेरणापुरुष’ मानावे लागतील!
सपा-बसपा आघाडीमुळे जसा काँग्रेसला धक्का बसला आहे तसा भाजपलादेखील तडाखा मिळाला आहे. गेल्या निवडणुकीत भाजपने उत्तर प्रदेशात तब्बल 73 जागा मिळवल्या होत्या. आता आधीच वातावरण प्रतिकूल, त्यात सपा-बसपा आघाडी झाल्याने भाजपची वाट या राज्यात बिकट झाली आहे. तरीही त्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष यावेळी भाजप एक जागा जास्तच, म्हणजे 74 जागा जिंकेल अशा गर्जना करीत आहेत. त्यांचा हा दुर्दम्य आशावाद पक्ष कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी असला तरी वस्तुस्थिती वेगळीच आहे. त्यामुळे अमित शहा यांच्या गर्जनेकडे एक विनोद म्हणून दुर्लक्ष केलेलेच बरे.
भाजपचे ‘मॉडेल’ मंत्री
नरेंद्र मोदींचे सरकार सत्तेवर आल्यानंतर ‘अच्छे दिन’चे कोंबडे आरवले नसले तरी जॅकेट आणि फोटोग्राफीला मात्र अच्छे दिन आले आहेत. स्वतः पंतप्रधानच ‘फोटोजेनिक’ असल्याने त्यांचे भक्तमंडळ कसे मागे राहील? आमच्याकडे हायकमांड तसेच घराणेशाही नाही म्हणून भाजपवाले दावे करत असले तरी येनकेनप्रकारेण मोदींना कसे खूश करता येईल याचा प्रयत्न प्रत्येकजण करत असतो. त्यात अनुराग ठाकूर कसे मागे राहतील? हे महाशय भाजपचे लोकसभेतील ‘व्हीप’ आहेत. म्हणजे सभागृहातील फ्लोअर मॅनेजमेंट ठेवायची जबाबदारी आणि सभागृहात भाजपचे खासदार जास्तीत जास्त कसे हजर राहतील असे पाहणे हे या ठाकूर यांचे काम आहे. मात्र ते स्वतःच तिहेरी तलाक आणि सवर्ण आरक्षण विधेयकाच्या मतदानापर्यंत सभागृहातून गायब होते. त्यांनाच कोणीतरी शोधून आणले होते. असे हे ठाकूर पुन्हा चर्चेत येण्याचे कारण म्हणजे त्यांनी घातलेला ‘नमो अगेन’ चा टी शर्ट. मोदींवरील भक्ती अशी दाखविल्यानंतर तरी हिमाचलचे मुख्यमंत्री म्हणून आपला विचार होईल किंवा केंद्रात मंत्रीपद मिळेल असा त्यांचा होरा असावा. वातावरण सरकारच्या विरोधात असताना अनुराग यांनी ‘नमो अगेन’ चा राग आळवल्याने मोदी यांनी खास ट्विट करून त्यांच्या या ‘अनुरागा’चे स्वागत केले. त्यानंतर पीयूष गोयल, बाबुल सुप्रियो, राजवर्धन राठोड, किरेन रिजिजू या मंत्र्यांनीही ‘नमो अगेन’चे टी शर्ट घातले आणि निष्ठा व्यक्त केली. त्यामुळे ‘नमो’ किती खूश झाले हे कळले नाही, मात्र हे टी शर्ट घातलेली मंडळी 2019 मध्ये ‘अगेन’ लोकसभेला निवडून येतील का, असा कुत्सित प्रश्न काही मंडळी विचारत आहेत.
‘संकटमोचक’ जेटली
मोदी सरकारचे ‘संकटमोचक’ म्हणून अर्थमंत्री अरुण जेटली यांनी वेळोवेळी अहम भूमिका पार पाडली आहे. आताही राफेल आणि सवर्ण आरक्षण या दोन्ही चर्चांच्या वेळी त्यांनी मध्ये उडी घेत सरकारची नाचक्की टाळली. लोकसभेत राफेलवरील चर्चेला उत्तर देताना राहुल गांधींच्या प्रश्नांच्या सरबत्तीसमोर संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांना उत्तर देणे अवघड जात असल्याचे लक्षात येताच जेटलींनी ते राज्यसभेचे सभागृह नेते असूनही लोकसभेत येऊन सरकार पक्षाचा किल्ला लढवला. राहुल यांची यथेच्छ खिल्ली उडवली. राहुल यांच्यावर वैयक्तिक पातळीवर टीका करून राफेलवरून मीडियाचे लक्ष इतरत्र वळविण्यात वकिलीत माहीर असलेले जेटली यशस्वी ठरले. त्याचवेळी राज्यसभेत सवर्ण आरक्षणाच्या विधेयकावेळी थावरचंद गेहलोत विरोधकांच्या भडिमारापुढे काहीसे हतबल असताना जेटलींनीच मोर्चा सांभाळला. सवर्णांना आरक्षण देण्याचा मुद्दा हिरिरीने मांडत जेटलींनी राज्यसभाही गाजवली. लक्ष्मणाला शक्ती लागली तेव्हा हनुमानाने एक हाताने पर्वत उचलला होता. भाजपच्या लक्ष्मणाची अवस्था गलितगात्र झालेली असताना आणि ‘राम’ अधिवेशन काळात बाहेर सभा घेत असताना जेटलींनी बजावलेली कामगिरी लाजवाब होती. विरोधक भलेही जेटलींना ‘ऑक्सिडेंटल डिफेन्स मिनिस्टर’ म्हणत असले तरी ते ‘ऑक्सिडेंटल संकटमोचक’ नक्कीच नाहीत!





























































