
सामना प्रतिनिधी । जळकोट
सन 2016 मध्ये अतिवृष्टी होऊन शेतीचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाकडून अनुदान देण्यात येत असून डोंगरकोनाळी (ता.जळकोट ) येथील काही शेतकऱ्यांना अनुदानाच्या यादीतून जाणीवपूर्वक वगळण्यात आले आहे. त्यामुळे या वंचित शेतक-यांना तातडीने अनुदान वाटप करावे, अशी मागणी शिवसेनेचे जळकोट तालुकाप्रमुख संगमेश्वर टाले यांनी जळकोटच्या तहसीलदार डॉ. शिवनंदा लंगडापुरे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
यासंबंधी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मौजे डोंगरकोनाळी (ता.जळकोट ) येथील बाबाराव निवृत्ती गव्हाणे, दिलीप किशन गव्हाणे, अभंग पुंडाजी गव्हाणे, वसंत राजाराम डावळे या शेतक-यांची नावे तलाठी व कृषी सहायक यांनी संगनमत करुन गावातील राजकारणातून वगळून या शेतक-यांवर अन्याय केला आहे. त्यामुळे या शासकीय कर्मचाऱ्यांची चौकशी करून दोषींना निलंबित करावे व या वंचित शेतकऱ्यांना अनुदान मिळवून द्यावे. याबाबत तातडीने कार्यवाही करुन न्याय नाही मिळाल्यास दि. 18 जानेवारी पासून शिवसेना व शेतकऱ्यांच्या वतीने जळकोटच्या तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येईल, याची गांभीर्याने नोंद घ्यावी, असा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे.






























































