
सामना प्रतिनिधी। चाकण
पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्याचा बदला हा आमच्या सल्ल्यानेच एअर स्ट्राइकद्वारे घेतल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. खेड तालुक्यातील भोसे येथे प्रचार सभेत ते बोलत होते.
पवार म्हणाले, पुलवामा येथे झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात हिंदुस्थानचे 40 जवान शहीद झाले. हल्ल्यानंतर तातडीने गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली दिल्लीत बैठक घेण्यात आली. तेव्हा मी पूर्वी संरक्षणमंत्री असल्याने पहिला प्रश्न मला विचारण्यात आला, त्यावर दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्याचे आदेश आपल्या जवानांना द्या, असा सल्ला मीच दिला होता. या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन उपस्थित नसल्याचे पवार यांनी सांगितले.

























































