इन्स्टाग्रामवर मायलेकींना त्रास देणारा अटकेत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन | प्रतिनिधी

इन्स्टाग्रामवर मायलेकींना त्रास देणाऱयाला साकीनाका पोलिसांनी जबलपूर येथून अटक केली. तो स्पूफिंगचा (व्हॉइस ओव्हर इंटरनेट प्रोटोकॉल)  वापर करत होता. त्याला ट्रान्झिस्ट रिमांडवर मुंबईमध्ये आणण्यात आले. अटक करून दिंडोशी सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते.

अंधेरी परिसरात राहणाऱया त्या मुलीचे इन्स्टाग्रामवर अकाऊंट आहे. गेल्या वर्षी तरुणाने तिला इन्स्टाग्रामवर रिक्वेस्ट पाठवली होती. त्यानंतर मुलीला तिचा मोबाईल नंबर आणि कुटुंबीयांचे फोटो पाठवण्यास सांगितले. त्यानंतर पाच दिवसांनी तरुणाने मुलीला अश्लील फोटो पाठवण्यास सांगितले. तरुणाचा त्रास वाढू लागल्याने सदर मुलीने याची माहिती आपल्या आईला सांगितली. नातेवाईकांनी साकीनाका पोलीस ठाण्यात धाव घेतली. साकीनाका पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला. परिमंडळ 10 चे पोलीस उपायुक्त नवीनचंद्र रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक किशोर सावंत, पोलीस निरीक्षक अरविंद शिर्के, पोलीस उपनिरीक्षक अभिषेक पाटील आणि पोलीस शिपाई संग्राम जगताप यांच्या पथकाने तपास सुरू केला. तपासात आयपी ऍड्रेस हा कराची दाखवला जात होता. दोन महिने पोलिसांनी तांत्रिक माहितीचा अभ्यास केला. अखेर पोलिसांना एक तांत्रिक माहिती मिळाली. तो आयपी ऍड्रेस कराचीचा नसून जबलपूरचा असल्याचे उघड झाले. त्यावरून पोलिसांनी त्या तरुणाला जबलपूर येथून ताब्यात घेतले. त्याच्या विरोधात विनयभंग आणि ‘पोक्सो’च्या गुह्यात अटक करून ट्रान्झिस्ट रिमांडवर मुंबई येथे आणण्यात आले. मोबाईल जप्त करून तो तांत्रिक विश्लेषणाकरिता न्याय सहायक प्रयोगशाळेत पाठवला जाणार आहे.