ईदच्या नमाजानंतर कश्मीरात दगडफेक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । श्रीनगर

कश्मीर खोऱयात रमजान ईदच्या नमाजानंतर श्रीनगरसह अनेक ठिकाणी देशद्रोहय़ांनी हैदोस घातला. सुरक्षा दलाच्या जवानांवर दगडफेक केली. जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मौलाना मसूद अजहर, दहशतवादी झाकीर मुसाचे पोस्टर्स लावले. हिंदुस्थानविरुद्ध नारेबाजी करीत ‘इसिस’चे झेंडे फडकावले.

श्रीनगर येथे जामा मशिदीत नमाजानंतर देशद्रोहय़ांनी देशविरोधी नारे देत सुरक्षा दलाच्या जवानांवर दगडफेक सुरू केली. दगडफेक करणाऱयांनी चेहरे झाकले होते. ‘कश्मीर बनेगा पाकिस्तान’, ‘इस्लामिक स्टेट ऑफ जम्मू-कश्मीर’ असा मजकूर असलेले फलक दगडफेक करणाऱयांच्या हातात होते. काही दिवसांपूर्वी दहशतवादी झाकीर मुसाचा खात्मा केला आहे. या मुसाच्या नावाने पोस्टर लावले. सुरक्षा दलाच्या जवानांनी जोरदारपणे प्रतिकार केला. अश्रुधुराच्या नळकांडय़ा फोडल्या. दगडफेकीत काही जवान जखमी झाले आहेत. अनंतनाग, सोपोरे, पुलवामा येथेही दगडफेकीच्या घटना घडल्या. ‘इसीस’चे पोस्टर, झेंडे फडकवण्यात आले. कश्मीर खोऱयात तणावपूर्ण शांतता असून अनेक ठिकाणी सुरक्षा दलाच्या जवानांच्या बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.

दहशतवाद्यांकडून महिलेची हत्या
पुलवामा येथे ईद साजरी करत असलेल्या एका महिलेची घरात घुसून दहशतवाद्यांनी हत्या केली. नगीनाजान असे या महिलेचे नाव आहे. दोन वर्षांपूर्वी नगीनाजान यांचे पती मोहम्मद युसूफ लोन यांचीही दहशतवाद्यांनी हत्या केली होती.