
सामना ऑनलाईन । मुंबई
टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग याने आज क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. निवृत्तीची घोषणा करतेवेळी युवराज भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. कर्क रोगासारख्या आजारावर मात करत मैदानात परतलेला युवराज सिंग मागील बराच कालावधी टीम इंडियाच्या बाहेर होता. आयपीएलमध्ये देखील फारशी चमक तो दाखवू शकलेला नव्हता. त्यानंतर त्याने आज निवृत्तीची घोषणा केली.
आपल्या कारकीर्दीत युवराजने टीम इंडियासाठी मोठे योगदान दिले आहे. एकाच षटकात सलग सहा षटकार ठोकणारा तो फलंदाज म्हणून त्याची ओळख आहे. टीम इंडियाला 2011 मधील वर्ल्ड कप आणि पहिला टी-20 वर्ल्ड कप जिंकून देण्याऱ्या संघात युवराजचा सहभाग होता.
युवराज निवृत्तीनंतर आयसीसीची मान्यता असलेल्या परदेशातील टी-20 लीगमध्ये खेळणार असेही बोलले जात आहे. बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, युवराजला कॅनडातील जीटी 20 आणि आयर्लंड व हॉलंडमधील युरो टी-20 स्पर्धेत खेळण्याचे आमंत्रण मिळाले आहे. इतर क्रिकेट स्पर्धांमध्ये खेळण्यासाठी भारतीय खेळाडूंना बीसीसीआयची परवानगी घ्यावी लागते. काही स्पर्धांसाठी क्रिकेटमधून निवृत्ती घेऊन त्यात सहभागी होता येते.


























































