
सामना प्रतिनिधी । लीडस्
सेमी फायनलमध्ये पोहचलेला हिंदुस्थानचा संघ उद्या वर्ल्ड कपमधील साखळी फेरीच्या अखेरच्या लढतीत श्रीलंकेशी सामना करील. याप्रसंगी विराट कोहलीच्या ब्रिगेडसमोर मधल्या फळीचा प्रश्न सोडवण्याचे आव्हान असेल. टीम इंडियाची एक नजर पहिल्या क्रमांकाच्या रेसवरही असणार यात शंका नाही. अर्थात पहिल्या स्थानावर पोहोचण्यासाठी हिंदुस्थानचा श्रीलंकेवर विजय आवश्यक असून दक्षिण आफ्रिकेने कांगारूंना हरवण्याचीही नितांत गरज आहे. एकूणच काय तर, वर्ल्ड कपच्या साखळी फेरीच्या अखेरच्या लढतीपर्यंत क्रिकेटप्रेमींना थरार अनुभवायला मिळणार आहे.
धोनीवर नजरा
उद्याच्या लढतीत पुन्हा एकदा महेंद्रसिंह धोनीच्या फलंदाजीवर सर्वांच्या नजरा असणार आहेत. रोहित शर्मा, लोकेश राहुल व विराट कोहली हे तीन फलंदाज फॉर्ममध्ये असल्यामुळे हिंदुस्थानला मधल्या फळीवर गांभीर्याने लक्ष द्यावे लागणार आहे. महेंद्रसिंह धोनी, रिषभ पंत, दिनेश कार्तिक यांची कामगिरी कशी होतेय हे पाहणे रंजक ठरणार आहे. जसप्रीत बुमराह ऍण्ड कंपनी जबरदस्त प्रदर्शन करीत असल्यामुळे यामध्ये मोठा बदल होईल असे वाटत नाही.
कांगारूंना टॉपवर राहायचेय…
ऑस्ट्रेलिया व दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये उद्या अन्य लढत रंगणार आहे. या लढतीत विजय मिळवून पहिल्या स्थानावर राहण्यासाठी ऍरोन फिंचची सेना सर्वस्व पणाला लावेल. कारण या लढतीतील पराभव त्यांना दुसऱया स्थानावर नेईल. अशा परिस्थितीत त्यांना इंग्लंडचा सामना करावा लागेल. पहिल्या स्थानावर राहिल्यास कांगारूंची लढत न्यूझीलंडशी होईल. इंग्लंडचा सध्याचा शानदार फॉर्म पाहता ऑस्ट्रेलियाची न्यूझीलंडला पसंती असेल यात वाद नाही.
जाडेजाला संधी?
हिंदुस्थानने निवडलेल्या 15 जणांच्या चमूपैकी रवींद्र जाडेजा याला अद्याप एकाही लढतीत अंतिम अकरामध्ये संधी देण्यात आलेली नाही (अपवाद मयांक अग्रवालचा). साखळी फेरीच्या अखेरच्या लढतीत त्याला संधी मिळेल अशी शक्यता निर्माण झाली होती. मात्र श्रीलंकेच्या संघात डावखुरे फलंदाज जास्त असल्यामुळे उद्याही त्याला टीम इंडियात चान्स मिळेल असे वाटत नाही.
लंकेला राखायचीय प्रतिष्ठा
श्रीलंकेचे या स्पर्धेतील आव्हान आधीच संपुष्टात आले आहे. त्यामुळे उद्याची लढत त्यांच्यासाठी प्रतिष्ठsची असणार आहे. हिंदुस्थानला हरवून स्पर्धेचा शेवट गोड करण्यासाठी त्यांचा प्रयत्न असेल.
आजच्या लढती
हिंदुस्थान-श्रीलंका
लीडस्, दुपारी 3 वाजता
ऑस्ट्रेलिया-दक्षिण आफ्रिका
मँचेस्टर, संध्याकाळी 6 वाजता




























































