
सामना प्रतिनिधी, मुंबई
दोन हजार सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केल्यानंतर मोबाईल चोरटय़ांना मोठय़ा शिताफीने वडाळा रेल्वे पोलिसांनी अटक केली. महंमद हुसेन अब्दुल रौफ शेख आणि महंमद कैफ शफी महंमद शहा अशी त्या दोघांची नावे आहेत. नशेकरिता ते दोघे चोऱ्या करत होते.
वांद्रे येथे राहणारे तक्रारदार हे एप्रिल महिन्यात सॅण्डहर्स्ट रोड येथून लोकलने प्रवास करत होते. लोकल रे रोड स्थानकात आल्यावर शेखने मोबाईल चोरून पळ काढला. घडल्याप्रकरणी वडाळा रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला. वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र पाल यांच्या पथकातील पोलीस हवालदार सुधीर चौधरी, पोलीस नाईक गुरू जाधव, सागर रणनवरे, मंगेश कदम, योगेश कदम, अक्षय कणसे, राकेश पाटील, अमित बनकर यांच्या पथकाने तपास सुरू केला. पोलीस गेल्या दोन महिन्यांपासून सॅण्डहर्स्ट रोड, रे रोड या स्थानकांतील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करत होते. दोन-पाच मिनिटांचे असे सुमारे दोन हजार सीसीटीव्ही फुटेजची पोलिसांनी पाहणी केली. आरोपीविरोधात शोधमोहीम सुरू असतानाच शेख हा दोन महिन्यांनंतर रे रोड स्थानकात आल्याचे चौधरी यांनी पाहिले. त्याआधारे शेखला पोलिसांनी ताब्यात घेतले. चौकशीत त्याने शफीसोबत मिळून चोऱया करत असल्याची कबुली दिली. त्या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांची चौकशी सुरू असल्याचे वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र पाल यांनी सांगितले.
दरवाजात उभे राहणाऱ्यांना करायचा टार्गेट
लोकलच्या दरवाजात बेसावधपणे उभ्या असलेल्या प्रवाशांना ही टोळी टार्गेट करायची. शेख हा मोबाईल चोरून धावत्या लोकलमधून उडी मारून पळ काढायचा तर शफी हा रेल्वे स्थानकात रेकी करत असायचा. अवघ्या काही मिनिटांत ते दोघे चोऱ्या करून पसार व्हायचे.


























































