
सामना ऑनलाईन । मुंबई
बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित 83 या आगामी चित्रपटाविषयी उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत 1983 या वर्षी हिंदुस्थानने ऐतिहासिक विजय मिळवत विश्वविजेतेपद पटकावलं होतं. या विश्वचषकाची विजयगाथा सांगणारा 83 हा चित्रपट येऊ घातला आहे. अभिनेता रणवीर सिंग या चित्रपटात कपिल देव यांची भूमिका साकारताना दिसणार आहे. रणवीरने 6 जुलै या आपल्या वाढदिवसाच्या दिवशी या चित्रपटातला त्याचा लूक प्रेक्षकांसाठी शेअर केला आहे.
”माझ्या या खास दिवसाप्रित्यर्थ प्रेक्षकांसाठी खास सादर आहे हरयाणाचं हरिकेन (वादळ) कपिल देव” अशी कॅप्शन देत त्याने हा लूक शेअर केला आहे. या फोटोला पाहून तो थेट कपिल देव यांच्यासारखा दिसत असल्याची पसंती सिनेरसिक आणि क्रिकेटवर्तुळातून मिळतेय. ’83’ या चित्रपटाद्वारे हिंदुस्थानच्या पहिल्या विश्वविजयाचे स्पप्न पडद्यावर साकारण्यात येत आहे. या चित्रपटासाठी रणवीर सिंह आणि टीमने प्रचंड मेहनत घेतली आहे. काही दिवसांपूर्वी रणवीर आणि इतर सहकारी कलाकारांनी धर्मशाला येथे जाऊन क्रिकेट खेळाडूंसोबत चर्चा केली होती आणि त्यांच्याकडून टीप्स घेतल्या होत्या. तसेच रणवीरने कपिल देव यांचीही भेट घेत त्यांच्याकडून मार्गदर्शन घेतले.
हेही वाचा- 83 : रणवीरची पत्नी बनण्यासाठी दीपिकाने घेतले 14 कोटी?
या चित्रपटात रणवीर खेरीज, आदिनाथ कोठारे (दिलीप वेंगसरकर), ताहीर भसीन (सुनील गावसकर), साकिब सलीम (मोहिंदर अमरनाथ), अॅम्मी विर्क (बलविंदर संधू), जीवा (कृष्णनामाचारी श्रीकांत), साहिल खट्टर (सय्यद किरमाणी), धैर्य करवा (रवी शास्त्री), दिनकर शर्मा (कीर्ती आझाद), चिराग पाटील (संदीप पाटील) जतीन सारना (यशपाल शर्मा), हॅरी संधू (मदन लाल), आर. बद्री (सुनील वालसन), पंकज त्रिपाठी (पीआर. मानसिंग) असे अभिनेते त्या विश्वविजेत्या संघातील खेळाडूंची भूमिका साकारताना दिसणार आहेत. तर कपिल देव यांच्या पत्नीच्या भूमिकेत रणवीर याची वास्तव आयुष्यातील पत्नी अभिनेत्री दीपिका पदुकोण झळकणार आहे. कबीर खान दिग्दर्शित हा चित्रपट 2020 च्या एप्रिल महिन्यात प्रदर्शित होणार आहे.

























































