रोज चार लाख अतिरिक्त आरक्षण, रेल्वे बुकिंगची कटकट संपणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नवी दिल्ली

लांबपल्ल्याच्या रेल्वे गाड्यांमध्ये बुकिंग मिळण्याची कटकट लवकरच संपणार आहे. येत्या काही दिवसांत  प्रवाशांना सहज कन्फर्म तिकीट उपलब्ध होणार आहे. रोज चार लाख अतिरिक्त आरक्षण उपलब्ध करून देणारी योजना आखण्यात आली असून ऑक्टोबर महिन्यापासून याची सुरुवात होणार असल्याची माहिती रेल्वेच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी दिली.

रेल्वेच्या बोगीमध्ये प्रकाशासाठी जनरेटरची आवश्यकता नाही. तसेच वातानुकूलित बोगीतही रेल्वे इंजिनमधून होत असलेला विजेचा पुरवठा पुरेसा असेल अशा गाड्यांमधील जनरेटरचे डबे काढण्यात येतील आणि त्या जागेचा वापर प्रवासी डब्यांसाठी करण्यात येणार आहे. यामुळे रोज चार लाख अतिरिक्त आसनक्षमता उपलब्ध होणार आहे.

सहा हजार कोटी रुपयांची इंधन बचत

साध्या एक्सप्रेस गाड्यांमध्ये दिवे आणि पंख्याची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी दर तासाला 120 युनिट विजेची आवश्यकता असते. त्यासाठी एका तासाला जवळपास 40 लिटर डिझेलची गरज भासते. वातानुकूलित डब्यांतील व्यवस्थेसाठी दर तासाला 65 ते 70 लिटर डिझेल वापरण्यात येते. हेड ऑन जनरेशनचा उपयोग केल्याने जवळपास सहा हजार कोटी रुपयांची इंधन बचत होणार आहे. सुमारे पाच हजार डब्यांत या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येईल.

एलपीजीप्रमाणे रेल्के तिकिटांचेही अनुदान सोडता येणार

आता एलपीजी सिलिंडरप्रमाणेच रेल्वे तिकिटांवर मिळणारे अनुदानही सोडता येणार आहे.  रेल्वे आपल्या प्रवाशांना तिकिटांवर मिळणारे अनुदान सोडण्याची विनंती करणार आहे. तिकिटांवरील अनुदान अंशतः अथवा पूर्णतः सोडता येणार आहे. हा प्रस्ताव सध्या अखेरच्या टप्प्यात आहे. केंद्र सरकारच्या 100 दिवसांच्या अजेंडय़ाअंतर्गत ही योजना लागू केली जाणार आहे.

रेल्वेचे तिकीट बुक करताना प्रवाशांना अनुदान सोडण्याबाबत विचारले जाणार आहे. अनुदान सोडल्यानंतर तिकिटाच्या दरावर त्याचा परिणाम होणार आहे. तिकिटाच्या दरावर प्रकाशांना किती टक्के अनुदान देण्यात येते याचा उल्लेख छापील तिकिटांवर करण्यात येतो. सध्या रेल्वेला तिकिटांच्या माध्यमातून फक्त 53 टक्के कमाई होते. उर्वरित 47 टक्के प्रवाशांना सबसिडीच्या स्वरूपात दिले जातात.

या आधी पंतप्रधानांनी घरगुती गॅसवरील अनुदान सोडण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर अनेकांनी गॅसवर मिळणारे अनुदान सोडले होते. तसेच हे अनुदान सोडल्यानंतर गावातील एका कुटुंबाला गॅस सिलिंडर मिळेल असे सरकारकडून सांगण्यात आले होते. दरम्यान, रेल्वे तिकिटांवरील अनुदानाचा उपयोग रेल्वेतील सुविधा काढवण्यासाठी करण्यात येणार आहे.

लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये दोन ते तीन जनरेटरचा वापर करण्यात येतो. या डिझेल जनरेटरच्या माध्यमातून प्रवासी बोगीतील दिवे, पंखे यासाठी विजेचा पुरवठा केला जातो. या व्यवस्थेत तांत्रिक बदल करून हेड ऑन जनरेशनचा उपयोग करण्यात येणार आहे. या व्यवस्थेत प्रामुख्याने रेल्वे ओव्हरहेडमधून होणाऱया विद्युत पुरवठय़ाचा उपयोग करण्यात येणार आहे.