समाज मंदिर ठेकेदाराच्या घशात घालण्याचा डाव, ‘म्हाडा’ने अभ्युदयनगरचा हॉल बळकावला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

काळाचौकी येथील अभ्युदयनगर ही वसाहत ‘म्हाडा’ची. येथील समाज मंदिर हॉलसुद्धा म्हाडाचाच, पण आता हाच हॉल एका खासगी ठेकेदाराच्या घशात घालण्याचा डाव म्हाडाने आखला आहे. त्यासाठी निविदा प्रक्रियाही राबवण्यात आली. मात्र ‘म्हाडा’च्या या मनमानीविरोधात हजारो रहिवाशांनी एकत्र येत स्वाक्षरी मोहीम राबवली असून ही निविदा रद्द करावी, असे निवेदन गृहनिर्माण मंत्री आणि मुख्यमंत्र्यांना देण्यात येणार आहे.

अभ्यु0दयनगर वसाहतीतील समाज मंदिर हॉलची उभारणी रहिवाशांच्या सांस्कृतिक, सामाजिक कार्यक्रमांसाठी करण्यात आली आहे. आता सर्व गृहनिर्माण संस्थांचा एकत्रित महासंघ असला तरी सुरुवातीच्या काळात वसाहतीत भाडेकरू संघ कार्यरत होता. ही वसाहत सरकारी आणि औद्योगिक कामगारांच्या निवासासाठी बांधण्यात आली होती. त्यामुळे त्या काळात सर्वच भाडेकरू होते. त्या भाडेकरूंचा संघ ही शिखर संस्था होती.

वसाहतीतील कोणत्याही रहिवाशाला वा इमारतीच्या ‘चाळ कमिटी’ला या हॉलमध्ये कार्यक्रम करायचा असेल तर तेव्हा भाडेकरू संघाचे ना-हरकत प्रमाणपत्र घेऊन म्हाडाला सादर करावे लागत होते. त्यानंतर या वसाहतीतील खोल्या भाडेकरूंना मालकी हक्काने मिळाल्या आणि भाडेकरू संघ विसर्जित झाला, गृहनिर्माण संस्था अस्तित्वात आल्या.

भाडे फक्त 2100 रुपये
या हॉलसाठी रहिवाशांना फक्त 2100 रुपये भाडे आकारण्यात येते. आता मात्र ‘म्हाडा’ने येथे ठेकेदारी पद्धत आणण्याचे प्रयत्न सुरू केले असून त्यासाठी निविदाही काढली. यामुळे रहिवाशांना आता कुठलाही कार्यक्रम येथे करायचा झाला तर तब्बल 1 लाख रुपये भाडे द्यावे लागणार आहे. म्हणूनच रहिवाशांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

गणेशोत्सव मंडळ
अभ्युदयनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा उत्सवही याच हॉलमध्ये सुरुवातीपासून सुरू आहे. अत्यंत नाममात्र दरात मंडळाला ‘म्हाडा’ हॉल उपलब्ध करून देते. मात्र आता खासगी ठेकेदार आला तर दिवसाला 1 लाख रुपये भरण्याची तयारी मंडळाला करावी लागणार आहे. सामाजिक भान असलेल्या या गणेशोत्सव मंडळाची मुंबईत ख्याती आहे. मात्र ‘म्हाडा’ने भान सोडले आहे, अशी तिखट प्रतिक्रिया आता व्यक्त होत आहे. गृहनिर्माण संस्थांच्या महासंघानेही ‘म्हाडा’च्या या ठेकेदारीचा तीक्र शब्दांत निषेध केला असून ही निविदा रद्द केली नाही तर म्हाडाविरोधात उग्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा दिला आहे.