
कोरोनाच्या संकटात रेमडेसिवीरसारख्या औषधांसह अन्य औषधे, साहित्य यांची खरेदी आणि वितरणाची संपूर्ण जबाबदारी राज्यांकडे सोपवावी, अशी विनंती मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे पत्राद्वारे आज केली आहे.
रेमडेसिवीरसारख्या कोरोनावरील उपचारासाठी अत्यंत आवश्यक अशा इंजेक्शनची खरेदी आणि वितरण केंद्र सरकार स्वतः करणार असल्याची बातमी वाचून मला धक्का बसला, असे राज ठाकरे यांनी पंतप्रधांनाना पाठवलेल्या पत्रात नमूद केले आहे. वास्तविक संबंधित राज्य सरकारचा आरोग्य विभाग, तेथील महानगरपालिका, स्थानिक यंत्रणा, विविध पातळ्यांवरील कर्मचारी असेच लोक अग्रभागी आहेत. तेच लोकांचे प्राण वाचवणे आणि त्यांना योग्य उपचार देणे यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत. असे असताना केंद्राने रेमडेसिवीरचे व्यवस्थापन स्वतःकडे ठेवण्याचा हेतू काय अशी विचारणा त्यांनी पत्रात केली आहे.





























































