
राज्यातील साखर कामगारांना गणपती बाप्पा पावला असून, 1 एप्रिल 2019 पासून 12 टक्के वेतनवाढ देण्याच्या निर्णयावर त्रिपक्षीय समितीच्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. या निर्णयाचा राज्यातील सुमारे दीड लाख साखर कामगारांना लाभ होणार आहे.
राज्यातील साखर कामगारांच्या वेतन कराराची मुदत 31 मार्च 2019 रोजी संपली होती. त्रिपक्षीय समिती तातडीने गठीत करून नवीन वेतनवाढ मिळावी, यासाठी राज्यातील साखर कामगार संघटनांनी राज्य शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला. महाराष्ट्र शासनाच्या उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाने 12 नोव्हेंबर 2020 रोजीच्या शासन निर्णयाने साखर कामगारांच्या वेतन वाढीवर निर्णय घेण्यासाठी त्रिपक्षीय समिती स्थापन केलेली आहे.
या समितीच्या आजपर्यंत 16 डिसेंबर 2020, 12 जानेवारी 2021, 11 फेब्रुवारी 2021 व 26 फेब्रुवारी 2021 अशा बैठका झाल्या; परंतु या बैठकांमध्ये साखर कारखाना प्रतिनिधी 5 ते 8 टक्के वेतनवाढ, तर साखर कामगार संघटना 20 टक्के वेतनवाढ मिळण्यासाठी ठाम होत्या. तोडगा न निघाल्याने राष्ट्रवादीचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांना निर्णय घेण्याचे अधिकार देण्यात आले होते. त्यानुसार शरद पवार यांनी साखर कारखानदार व साखर कामगार प्रतिनिधीशी चर्चा करून 12 टक्क्यांपर्यंत वेतनवाढ देण्याचा निर्णय घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार गुरुवारी (दि. 9) पुणे येथील साखर संकुलात राज्य साखर कारखाना संघ तथा त्रिपक्ष समितीचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांच्या अध्यक्षतेखाली त्रिपक्षीय समितीची बैठक झाली. त्यात 12 टक्के वेतनवाढ देण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. 1 एप्रिल 2019 पासून ही वेतनवाढ लागू करण्यात येणार आहे.
या बैठकीला साखर आयुक्त शेखर गायकवाड, कामगार आयुक्त महेंद्र कल्याणकर, सदस्य सचिव कल्याण आयुक्त रविराज इळवे, साखर कारखाना संघाचे उपाध्यक्ष आबासाहेब पाटील, हर्षवर्धन पाटील, कादवा कारखान्याचे अध्यक्ष श्रीराम शेटे, प्रकाश आवाडे, राजेंद्र नागवडे, साखर संघाचे व्यवस्थापकीय संचालक संजय खताळ, साखर कामगार संघटना प्रतिनिधी म्हणून महाराष्ट्र राज्य साखर कामगार फेडरेशन(इंटक)चे अध्यक्ष अविनाश आदिक, सरचिटणीस नितीन पवार, साखर कामगार प्रतिनिधी मंडळाचे अध्यक्ष तात्यासाहेब काळे, कार्याध्यक्ष अविनाश आपटे, साखर कामगार महासंघाचे सरचिटणीस कॉ. सुभाष काकुस्ते, चिटणीस कॉ. आनंद वायकर, अशोक बिरासदार, रावसाहेब पाटील, शंकरराव भोसले, सुरेश मोहिते, डी. डी. वाकचौरे, योगेश हंबीर आदी उपस्थित होते. वेतनवाढीच्या या निर्णयाचे महाराष्ट्र राज्य साखर कामगार फेडरेशनचे खजिनदार डी. एम. निमसे, संपर्कप्रमुख सुखदेव फुलारी, अशोक पवार, संभाजी माळवदे यांनी स्वागत केले आहे.

























































