हिजाब ही एक वाईट प्रथा; महिलांच्या स्वातंत्र्यावर गदा, योगी आदित्यनाथ यांचे वादग्रस्त विधान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कर्नाटकच्या हिजाब वादाचे देशभर पडसाद उमटत असतानाच या वादात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उडी घेतली आहे. कुठलीही मुलगी स्वेच्छेने हिजाब परिधान करीत नाही. ही एक वाईट प्रथा आहे. काही लोक महिलांच्या स्वातंत्र्यावर गदा आणण्यासाठी ही प्रथा जबरदस्तीने लादताहेत, असे वादग्रस्त विधान योगींनी गुरुवारी केले.

योगींनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीवेळी हिजाब वादात तोंड घातले. ‘तीन तलाक’च्या वाईट प्रथेचा कुठली मुलगी किंवा महिला स्वेच्छेने स्वीकार करीत होती का? जरा त्या भगिनींना विचारा. मी तर लखनौमध्ये ‘तीन तलाक’मुळे त्रासलेल्या महिलांचे संमेलन भरवले होते. मी त्या भगिनींसह त्यांच्या आई-वडील, भाऊ-बहिणींचे अश्रू पाहिलेत. जेव्हा त्या भगिनी मंचावर येऊन आपली व्यथा मांडायच्या, त्यावेळी त्यांच्यासमोर बसलेल्या आई, वडील, भाऊ अश्रू ढाळताना दिसायचे, असे नमूद करीत योगींनी हिजाब परिधान करण्यावर आक्षेप घेतला.

मग योगींच्या कपडय़ांवर आक्षेप का नाही – ओवेसी

योगी आदित्यनाथ यांच्या विधानावर एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी पलटवार केला आहे. हिजाबवर इतका वाद घातला जातोय, मग योगी आदित्यनाथ यांच्या कपडय़ांवर आक्षेप का घेतला जात नाही? कोणी क्रॉस घालत असेल किंवा कोणी टिकली लावत असेल तर त्यावर आक्षेप नसतो, मग हिजाबलाच विरोध का? तुम्हाला मुलींचे केस का बघायचेत? असा सवाल ओवेसी यांनी केला.