
संगमनेर शहरालगत असलेल्या अमृतवाहिनी कॉलेजसमोरील एचडीएफसी बँकेचे एटीएम स्फोटकांचा वापर करून चोरटय़ांनी फोडून 20 लाख 77 हजार रुपये लुटले. बुधवारी मध्यरात्री घडलेल्या घटनेने संगमनेर शहरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, यापूर्वीही तालुक्यातील समनापूर येथे अशाच पद्धतीने स्फोटकांचा वापर करून एटीएम फोडून लाखो रुपये लंपास करण्यात आले होते. या घटनेला काही दिवस उलटत नाही तोच रात्री एचडीएफसी बँकेच्या एटीएम फोडण्यात आले आहे.
संगमनेर शहर पोलिसांनी यासंदर्भात दोन अज्ञात इसमांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, संजीवकुमार ओमकार उर्फ योगेंद्र रॉय यांनी फिर्याद दिली आहे.
संगमनेर शहरापासून तीन किलोमीटर अंतरावर अमृतवाणी कॉलेजसमोर एचडीएफसी बँकेचे एटीएम आहे. सध्या अमृतवाहिनी कॉलेज ते बसस्थानकापर्यंत जुन्या पुणे-नाशिक महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. रस्त्यांच्या कामामुळे काहीतरी स्फोटाचा आवाज झाला असावा, असे स्थानिक नागरिकांना वाटले. मात्र, चोरटय़ांनी या संधीचा फायदा उठवत एटीएम स्फोटके लावून फोडले आणि पैसे लुटले. स्फोट इतका मोठा होता की, बँकेचे एटीएम मशीन अक्षरशः शंभर फुटांवर येऊन पडले होते. या ठिकाणी पोलिसांना स्फोट घडवून आणण्यासाठी वापरलेलं साहित्यही आढळले आहे.
संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांनी घटनास्थळी भेट देऊन पोलिसांच्या दोन टीम चोरटय़ांचा शोध घेण्यासाठी रवाना केल्या आहेत.
स्फोटके नेमकी कोणती?
यापूर्वी संगमनेर तालुक्यातील समनापूर येथे स्फोटकांच्या साहाय्याने एटीएम फोडून लाखो रुपये लुटण्यात आले होते. अगदी त्याचप्रकारे रात्री एचडीएफसीचे एटीएम फोडण्यात आले आहे. हा स्फोट नेमका कोणत्या स्फोटकांच्या साहाय्याने केला आहे, याचा पोलिसांना उलगडा झालेला नाही. जिलेटीन वापरून हा स्फोट केला असल्याची चर्चा असली तरी शहानिशा झालेली नाही.






























































