पश्चिमरंग; मेलडी आणि हार्मनी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>दुष्यंतकुमार पाटील

आपलं हिंदुस्थानी संगीत हे मेलडीप्रधान आहे असं म्हणता येईल. एखादा गायक एखादं गाणं गात असेल तर त्या गाण्यातल्या स्वरांनी जी सुरावट बनते ती म्हणजे मेलडी. एखादं वाद्य घेऊन वादन करताना आपण एकामागोमाग एक असे स्वर वाजवत गेलो तर ऐकू येणाऱया स्वररचनेला मेलडी असं म्हणतात येईल. एखादं आवडणारं संगीत किंवा गाणं आपण गुणगुणत असतो तेव्हा ती मेलडीच असते!

पाश्चात्त्य संगीत आणि आपलं संगीत यातला एक अतिशय महत्त्वाचा फरक म्हणजे हार्मनी. हार्मनी म्हणजे पाश्चात्त्य संगीताचा प्राण आहे असं म्हटलं जातं ! आपल्या संगीतात मात्र हार्मनी अपवादानंच पाहायला मिळते.

हार्मनी म्हणजे नेमकं काय ते समजण्यासाठी आधी आपण मेलडी म्हणजे काय ते पाहू या. मेलडी म्हणजे सुरावट. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर संगीतात एकामागोमाग एक येणाऱया स्वरांनी जी मोहक रचना बनते ती म्हणजे मेलडी. आपलं हिंदुस्थानी संगीत हे मेलडीप्रधान आहे असं म्हणता येईल. एखादा गायक एखादं गाणं गात असेल तर त्या गाण्यातल्या स्वरांनी जी सुरावट बनते ती म्हणजे मेलडी. एखादं वाद्य घेऊन वादन करताना आपण एकामागोमाग एक असे स्वर वाजवत गेलो तर ऐकू येणाऱया स्वररचनेला मेलडी असं म्हणतात येईल. एखादं आवडणारं संगीत किंवा गाणं आपण गुणगुणत असतो तेव्हा ती मेलडीच असते!
हार्मनी ही संकल्पना यापेक्षा वेगळी आहे. कल्पना करा की, चार लोक आपापलं व्हायोलिन वाजवत आहेत, पण त्यांचं वादन एकसुरात नाही असं समजा. म्हणजे पहिला वादक सप्तकातला ‘सा’ वाजवताना दुसरा वादक ‘ग’, तिसरा ‘प’ तर चौथा वरच्या सप्तकातला ‘सा’ वाजवतोय. यानंतर चारही वादक काही नियमांचं पालन करत वेगवेगळे स्वर वाजवत जातात. एकाच वेळी बरेच स्वर येत असले तरी अशा प्रकारच्या संगीतात एक प्रकारची स्वरसंगती असते. या संगीतात हार्मनी आहे असं आपल्याला म्हणता येईल. अर्थातच संगीतात एकाच वेळी बरेचसे स्वर येऊनही त्यात गोंधळ किंवा कर्कशता न येता त्यातून सुंदर संगीत निर्माण व्हावं यासाठी हार्मनीचे बरेच नियम आहेत.

बरेच स्वर चालू असतानाही आपल्याला त्यातून गोंधळ न ऐकू येता मधूर संगीत का ऐकू येतं? याचं कारण म्हणजे त्या स्वरांपैकी सर्वात वरचा स्वर आपल्याला जास्त स्पष्टपणे ऐकू येतो. त्यामुळं एकाच वेळी बरेच वादक वाजवत असले तरी त्यातल्या वरच्या स्वरांनी बनणारी सुरावट आपल्याला अधिक ठळकपणे अनुभवायला येते. बाकीच्या स्वरांमुळं या सुरावटीला एक वेगळीच खोली येते आणि एक विशिष्ट प्रकारचा परिणाम साधला जातो.

ही सारी थिअरी झाली, पण प्रत्यक्षात हार्मनी कशी असते ते अनुभवायची असेल तर आपल्याला हार्मनी असणारं संगीत अनुभवायला हवं. तसं तर बहुतेक साऱया पाश्चात्त्य संगीतात हार्मनी येतेच, पण काही रचनांमध्ये ती ठळकपणे जाणवते. उदा. आपण डवोझाकच्या न्यू वर्ल्ड सिम्फनीमधली दुसरी मुव्हमेंट ऐकू शकतो. आपण यूटय़ूबवर ‘Dvorak Symphony No 9 From the New world Largo’ असा शोध घेतला तर बरेचसे व्हिडीओ मिळतात. ही रचना सारं वाद्यवृंद (orchestra) वाजवताना दिसतो. यातली मुख्य थीम असणारी सुरावट पटकन आपल्या मनाचा ठाव घेते. या अखंड रचनेत आपल्याला हार्मनी सतत अनुभवायला मिळते. याशिवाय आपण Barber – Adagio for Strings ही बऱयाचशा व्हायोलिन वादकांनी एकत्र वाजवण्यासाठी केलेली रचनाही यूटय़ूबवर ऐकू शकतो.

काही वाद्यांमधून एकाच वेळी बरेच स्वर येण्याची क्षमता असल्यानं त्यांच्या सोलो रचनांमध्येही हार्मनी येऊ शकते. उदा. एखादा पियानो वादक पियानोवर संगीत रचना सादर करताना एकाच वेळी वेगवेगळ्या बोटांचा (आणि दोन्ही हातांचा) वापर करून एकाच वेळी वेगवेगळे स्वर वाजवून वादनामध्ये हार्मनी आणू शकतो. बासरीसारख्या वाद्यातून मात्र एका वेळी एकच स्वर येत असल्यानं एकटय़ा बासरीच्या संगीतात हार्मनी येणं शक्य नसतं. आपल्या गळ्यातून एका वेळी एकच स्वर येत असल्यानं एखादा गायक किंवा गायिका गाताना त्यात हार्मनी येऊ शकत नाही, पण समूह गायनात वेगवेगळ्या गायकांनी वेगवेगळ्या स्वरांत गाणं शक्य असल्यानं त्यामध्ये हार्मनी आणणं शक्य होतं.

जसंजसं आपण पाश्चात्त्य अभिजात संगीत ऐकत जाऊ तसतसं आपल्याला त्यातल्या हार्मनीची जादू जाणवल्याशिवाय राहत नाही! [email protected]