
महात्मा गांधी आणि स्वातंत्र्यसैनिकांनी स्थापन केलेल्या येथील खादी ग्रामोद्योगचा कोटय़वधींचा भूखंड महाडिक परिवाराकडून हडपण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप माजी नगरसेविका भारती पवार आणि माजी नगरसेवक दिलीप शेटे यांनी आज पत्रकार परिषदेत केला. याप्रकरणी आपण ईडीकडे तक्रार करणार असून, भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यासाठी पुढे येतील का, असे आव्हानही त्यांनी दिले आहे.
या जागेच्या व्यवहारात महाडिकांकडून तब्बल दोनशे कोटींचा ढपला पाडला जात असून, जागेच्या मालमत्तापत्रकी भाजपचे माजी आमदार अमल महाडिक त्यांचे बंधू स्वरूप महाडिक तसेच बांधकाम व्यावसायिक गिरीश रायबागे, राजन शिंदे यांची नावे बेकायदेशीर लावण्यात आली आहेत. धर्मादाय आयुक्त कार्यालयातील अधिकाऱयांनीही यामध्ये लाच घेतल्याचा गंभीर आरोपही यावेळी भारती पोवार यांनी केला.
सोलापूरहून शिरोलीत आलेल्या महाडिक कंपनीने आजपर्यंत शहरातील मोक्याच्या जागा हडपण्याचा धंदा अनेक वर्षे केला. आता राष्ट्रपिता महात्मा गांधींनादेखील सोडलेले नाही. देशासाठी बलिदान देणाऱया महात्मा गांधी आणि येथील स्वातंत्र्य सैनिकांनी स्थापन केलेल्या मोक्याच्या तब्बल साडेपाच एकर जागेचा सन 2001चा रायसन कन्ट्रक्शनशी विकसन करार असताना तो विक्री करार दाखवून या जागेच्या मालमत्तापत्रकी महाडिक कुटुंबीयांची नावे लावली आहेत. यात या ग्रामोद्योग संघाची सुमारे 200 कोटींची मालमत्ता अवघ्या दहा ते पंधरा कोटीत महाडिक कुटुंब हडप करत असल्याचा आरोपही भारती पोवार आणि दिलीप शेटे यांनी केला. तसेच महाडिक कुटुंबीयांच्या दहशतीविरोधात आता महात्मा गांधी विचार मंचच्या माध्यमातून लढा उभारणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

























































