
पत्नीने तिच्या माहेरून परतण्यास नकार दिल्याने रागाच्या भरात पंजाबमधील जालंधर जिल्ह्यात एका 30 वर्षीय इसमाने पत्नीसहित तिच्या कुटुंबातील चार जणांना झोपेत असताना जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, परमजीत कौर तिच्या दोन मुलांसह पंजाबमधील जालंधर जिल्ह्यात तिच्या पालकांसोबत पाच-सहा महिन्यांपासून राहत होती. या महिलेचा पती कुलदीप सिंगने पत्नी परमजीतला लुधियानाच्या खुर्शेदपूर या त्याच्या गावात परतण्यास सांगितले. परंतु कुलदीप तिला आणि मुलांना मारहाण करत असे यामुळे तिने परत येण्यास नकार दिला.
याचा राग मनात ठेवत सोमवारी रात्री उशिरा कुलदीप आणि त्याच्या दोन साथीदारांनी पत्नीसहित तिच्या सासरच्या पाच जणांवर पेट्रोल टाकून त्यांना पेटवून दिले. यात या पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. परमजीत कौर, तिचे वडील सुरजन सिंग, आई जोगिंद्रो आणि तिची दोन मुले अर्शदीप (8) आणि अनमोल (5) अशी मृतांची नावे आहेत, या घटनेतील आरोपींचा शोध सुरू असून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.






























































