सामना अग्रलेख – जिंकणार तर होतोच! महाराष्ट्राची परंपरा व बरेच काही!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेना अंधेरीतील विधानसभा पोटनिवडणूक कोणत्याही परिस्थितीत जिंकणारच होती. 2014 साली रमेश लटके भाजपशिवाय येथे जिंकले व 2019 साली भाजपच्या युतीत जिंकले. म्हणजे हा मतदारसंघ स्वाभिमानी शिवसेनेस मानणारा आहे. आताही मतदानाच्या माध्यमातून तेथील लोकांच्या मनातील संताप, चीड व सहानुभूतीचा लाव्हा धगधगत्या मशालीसारखा उसळून बाहेर पडला असता. ठीक आहे. मैदानात आज नाहीतर उद्या उतरू. आज तरी निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न करणाऱ्या सगळय़ांचे विनम्र आभार! आमच्या मनात कोणतीही जळमटे नाहीत. मराठी एकजूट तुटू नये ही आमची आजही इच्छा आहे!

अगा पूर्वापर सागर। ययां नामसीचि सिनार।

येर आघवें तें नीर। एक जैसें।।

(ज्ञानेश्वरी 18.1589/90)

पूर्व समुद्र आणि पश्चिम समुद्र या नावातच काय तो वेगळेपणा असतो. बाकी सगळे पाणी एकच असते. राजकारणही ‘ज्ञानेश्वरी’च्या या तत्त्वाप्रमाणेच आहे. राजकीय पक्ष, त्यांचे विचार यांत भिन्नता असते. माणसांतील स्वभावदोष तेथेही असतात. पुन्हा स्वार्थाची बजबजपुरीही आहेच. मात्र सध्याच्या राजकारणात सगळे पाणी एकच आहे हे अंधेरी पोटनिवडणुकीतील घडामोडींनी दाखवून दिले. भारतीय जनता पक्षाने अंधेरी पोटनिवडणुकीतून मोठय़ा मनाने माघार घेतली. त्यामुळे एक झाले, भाजपासही मन आहे व ते मोठे आहे हे दिसून आले. पंतप्रधान मोदी देशातील जनतेशी संवाद साधतात. ‘मन की बात’ करतात. म्हणजे मनाचा मनाशी संवाद होतो. तीच ‘मन की बात’ अंधेरी पोटनिवडणुकीच्या बाबतीत महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनी राखली, याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे हे आमचे कर्तव्यच आहे. आमदार रमेश लटके यांच्या निधनाने विधानसभेची ही पोटनिवडणूक लागली. लटके स्वर्गवासी झाले तेव्हा शिवसेना एकसंध होती व पोटनिवडणूक लागली तेव्हा भारतीय जनता पक्षाने मिंधे गटास हाताशी धरून शिवसेनेवर फुटीचा घाव घातला होता. शिवसेना हे ऐतिहासिक नाव, धनुष्यबाण हे चिन्हही निवडणूक आयोगाने गोठवले. शिवसेनेस मशाल चिन्ह मिळाले, पण स्वर्गीय लटके यांच्या पत्नीस उमेदवारी जाहीर केल्यावर त्यांचा महानगरपालिकेतील नोकरीचा राजीनामा अडवून ठेवण्याची एक हलकट खेळी झाली. त्यात अखेर उच्च न्यायालयास हस्तक्षेप करावा लागला. हे काही महाराष्ट्राच्या महान परंपरेला, संस्कृतीस धरून झाले नाही. महाराष्ट्राची संस्कृती आणि परंपरा महानच आहे. त्या परंपरेच्या सुरक्षेसाठी शिवसेनेचा जन्म झाला. महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी संयुक्त महाराष्ट्राचा लढा झाला व त्या लढय़ातून मिळालेल्या मुंबईसह महाराष्ट्राच्या रक्षणासाठी शिवसेनेने जन्म घेतला. त्याच शिवसेनेला जमिनीत गाडण्याची भाषा भाजपकडून झाली ही काही आपली परंपरा नाही, पण अघोरी सत्तेपुढे सर्व शहाणपण, परंपरा गुडघे टेकतात. अंधेरी पोटनिवडणुकीच्या निकालात

जनमताचा कौल

काय आहे? मुंबईकर जनतेच्या मनात कोणत्या विचारांची मशाल पेटली आहे हे नक्कीच समजले असते. ही पोटनिवडणूक जाहीर झाली आणि शिवसेनेने दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या सुविद्य पत्नी ऋतुजा यांचे नाव निश्चित केले तेव्हा ऋतुजा यांच्यासमोर मिंधे गटाचा उमेदवार उतरवायचा की भाजपचा उमेदवार, यावर खल झाला. बैठकांचा फडशा पडत राहिला. शेवटी शिवसेनेकडून आताच मिंधे गटाचा पराभव झाला तर सगळेच मुसळ केरात जायचे, या सुज्ञ विचाराने भाजपने आपला उमेदवार उतरवून प्रचार सुरू केला. शिवसेनेच्या पराभवासाठी कंबर कसली, पण सरतेशेवटी जमिनीवरील परिस्थितीचा अंदाज आल्याने महाराष्ट्राच्या महान संस्कृती व परंपरेचा आदर राखून भाजपने आपला उमेदवार मागे घेतला. अर्थात, भाजपने उमेदवार मागे घेतला, पण पोटनिवडणूक अद्याप टळली नाही. 14 पैकी सातजणांनी माघार घेतली व काही उमेदवार रिंगणात कायम आहेत. त्यांचे काय करायचे? वास्तविक अशी निवडणूक यासाठी टाळायची असते की, ज्या उमेदवाराचे निधन झाले आहे त्यांची पत्नी किंवा मुलगा त्यांच्या जागी लढत असतो. दुसरे म्हणजे, सरकारी श्रम व पैशांचा अपव्यय टाळता आल्यास पाहावे, हादेखील एक विचार असतो. मात्र यासाठी ‘परंपरा’ म्हणून सगळय़ांनी एकत्र बसून पहिल्यापासून निर्णय घ्यायचे असतात. राजकारणात मढय़ाच्या टाळूवरचे लोणी खाऊ नये ही महाराष्ट्राची परंपरा व संस्कृती आहे. अंधेरीच्या बाबतीत निर्णय घेण्यास उशीर झाला व भाजपने माघार घेऊनही आता पोटनिवडणूक होईल. शरद पवार यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याने निवडणूक बिनविरोध व्हावी असे आवाहन आधीच केले. त्याकडे दुर्लक्ष केले. श्री. राज ठाकरे यांनी निवडणूक बिनविरोध झाल्यास स्व. लटके यांच्या आत्म्यास शांती लाभेल असे पत्ररूपी आवाहन केल्यावर भाजपने त्या पत्राचा विचार केला. त्यामुळे भाजप व श्री. राज ठाकरे यांचे आभार मानायला हवेत. पण अंधेरी पोटनिवडणुकीत ज्या महाराष्ट्रीय परंपरा आणि संस्कृतीची जाण भाजपने ठेवली

ती जाण

गेल्या दीड वर्षात झालेल्या इतर पोटनिवडणुकांत का ठेवली नाही? कोल्हापूर उत्तरचे आमदार चंद्रकांत जाधव यांचे निधन झाले. त्यांच्या पत्नी श्रीमती जयश्री जाधव काँग्रेसकडून पोटनिवडणुकीस उभ्या राहिल्या. ती जागा भाजपने लढवली. मात्र श्रीमती जाधव जिंकल्या. त्याआधी पंढरपूर, मंगळवेढा मतदारसंघाचे आमदार भारत भालके यांचे निधन झाले. त्यांच्या जागी भालक्यांचे चिरंजीव उभे राहिले. तेथे भाजपने समाधान आवताडे यांना उभे करून निवडणूक जिंकली. नांदेडच्या देगलूर मतदारसंघाचे काँग्रेस आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचे निधन झाले. तेथेही अंतापूरकरांचे चिरंजीव पोटनिवडणुकीत उभे राहिले व जिंकले. ही जागासुद्धा भाजपने लढवली. एखाद्याच्या निधनाने रिकाम्या झालेल्या जागेवर निवडणूक बिनविरोध व्हावी ही परंपरा या ठिकाणीही राखता आली असती. पण तसे झाले नाही. असो. मुंबईतील पोटनिवडणुकीत या परंपरेचे भान भाजपने राखले. मात्र हे असे का झाले? कसे घडले? भाजपने शिवसेनेसाठी मन मोठे का केले? या प्रश्नांची उत्तरे आम्हाला देण्याची गरज नाही. महाराष्ट्र व जनता सर्वकाही जाणते. शिवसेना अंधेरीतील विधानसभा पोटनिवडणूक कोणत्याही परिस्थितीत जिंकणारच होती. 2014 साली रमेश लटके भाजपशिवाय येथे जिंकले व 2019 साली भाजपच्या युतीत जिंकले. म्हणजे हा मतदारसंघ स्वाभिमानी शिवसेनेस मानणारा आहे. आताही मतदानाच्या माध्यमातून तेथील लोकांच्या मनातील संताप, चीड व सहानुभूतीचा लाव्हा धगधगत्या मशालीसारखा उसळून बाहेर पडला असता. प्रत्यक्ष निवडणुकीच्या रणमैदानावरचा हा असा विजय आजच्या सरकारला, मिंधे गटाला व महाराष्ट्राच्या दुश्मनांना परवडला नसता हे मान्य करायलाच हवे. इतके घाव छातीवर आणि पाठीवर झेलूनही शिवसेना जिंकते, पुढे जाते याचा अर्थ उद्याचे भवितव्य हे आमच्या शिवसेनेचेच आहे. ठीक आहे. मैदानात आज नाहीतर उद्या उतरू. आज तरी निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न करणाऱ्या सगळय़ांचे विनम्र आभार! आमच्या मनात कोणतीही जळमटे नाहीत. मराठी एकजूट तुटू नये ही आमची आजही इच्छा आहे!