
>> डॉ. नीलम ताटके
एका पुस्तकाच्या मुखपृष्ठाने लक्ष वेधून घेतले. पुस्तकाचं नाव ‘माझ्या धडपडीचा कार्यनामा’ लेखक आनंद करंदीकर. लक्ष वेधून घेण्याचं कारण म्हणजे मुखपृष्ठावरचा मजकूर – उद्योग, व्यवस्थापन, लेखन, समाजकार्य एक उद्बोधक मुशाफिरी! माणसं एकाच वेळी किती क्षेत्रांत काम करू शकतात आणि तीही टोकाच्या वेगळय़ा क्षेत्रात!
मनोगतात त्यांनी स्पष्टपणे म्हटले आहे की, हे लेखन कार्यानुभव म्हणजे वेगवेगळी कामे करताना आलेल्या अनुभवांचे आहे. त्यामुळे प्रेमप्रकरण, कौटुंबिक कलह यांसारखे खमंग विषय यात जवळपास नाहीत. लिखाणाची सुरुवात लहानपण, शाळा यांपासून झाली असली तरी मोजकेच प्रसंग लिहिले आहेत. फोटो नाही तर सगळं शब्दात मांडलंय. साधी, सोपी भाषा आणि पारदर्शकता हेही या आत्मचरित्राचे वैशिष्टय़ म्हणावे लागेल. अनुक्रमणिकेवर नजर टाकल्यास विषय वैविध्य लक्षात येते. युक्रांदमधले चळवळीचे दिवस, संशोधन प्रकल्प ते थेट स्वतःची सल्लागार कंपनी मेट्रिकविषयी विस्ताराने लिहिले आहे. सामाजिक चळवळीत पुनःप्रवेश, जगण्याचे तत्त्व, सूत्र असे वेगळे विषय असल्याने वाचकांची उत्सुकता वाढते.
स्त्री-पुरुष समानता लहानपणापासूनच घरात असल्याने व्यावसायिक व सामाजिक जीवनात तेच तत्त्व त्यांनी अंगीकारले. त्यांच्या लिखाणातले एक वाक्य मनात राहिलं, ते स्वतः कंपनीचे मालक असूनही आपल्या बिझनेस पार्टनरने ऑफिसमधल्या स्त्री कर्मचाऱ्यांना अपमानास्पद वागणूक देणं त्यांना खटकत होतं, हे विशेष.
या आत्मचरित्राचे आजच्या तरुण पिढीला नक्कीच मार्गदर्शन होईल, हे नक्की. स्वतःला झोकून देऊन काम किती आनंद देतं हे यातून कळतं. स्त्री-पुरुष नातेसंबंधावर त्यांनी मोकळेपणाने लिहिले आहे. त्यांच्याबरोबर काम करतानाही अनेक गोष्टी शिकायला मिळतात. त्यांनी अनेक कंपन्यातील कामगारांना प्रशिक्षण दिले, सेवा सुधारायला मदत केली. काही कंपन्यांची विक्री वाढवली. अनेकांना करिअरचे नवे दालन खुले केले.
त्यांचे बालपण चांगल्या स्थितीत गेले होते तरी त्यांना सामाजिक प्रश्नांची जाणीव होती, सजगता होती, हे वाखाणण्याजोगे आहे. आनंद करंदीकर हे अतिशय बुद्धिमान जन्मतःच नेतृत्वगुण अंगी असलेले आहेत.
त्यांच्या व्यक्तिमत्त्वाविषयी लिहिले गेले आहे ते असे की, त्यांच्या स्वभावाचे वैशिष्टय़ त्यांच्या नावातच आनंद आहे. ते कधी निराश होत नाहीत आणि झाले तरी त्यांची आंतरिक ऊर्जा निराशेचे झाकोळ झटकून टाकते. ते नव्या आव्हानांचा शोध घेत त्या निराशेला भिडतात. विशेष म्हणजे हे भिडणारे अभ्यासपूर्ण असतं.
त्यांच्याबरोबर काम करणं हेच एक प्रशिक्षण असतं, असं त्यांचे सहकारी सांगतात. एक वाचनीय नव्हे संग्रही ठेवण्याजोगे पुस्तक आहे.
माझ्या धडपडीचा कार्यनामा
लेखक : आनंद करंदीकर
प्रकाशक : रोहन प्रकाशन
पृष्ठे : 324, मूल्य : रुपये 395/-





























































