
भेसळयुक्त वस्तूंची विक्री काही जण सर्रास करत असतात. बेकायदेशीरपणे वस्तूंची विक्री केल्यामुळे इतरांना याचा किती त्रास होऊ शकतो, हा मुद्दा विचारात घेतला जात नाही. नफा कमावण्याच्या हेतूने केलेल्या भेसळयुक्त वस्तूंच्या विक्रीमुळे लोकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो, अशा प्रकारची घटना नुकतीच इंग्लंड येथे घडली आहे.
डेली स्टार न्यूज वेबसाईटमधील वृत्तानुसार, लंडन पोलिसांच्या इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी क्राईम युनिटने मंगळवारी मॅंचेस्टरमधील दोन व्यावसायिक मालमत्तेवर छापा टाकला. या छाप्यावेळी सुमारे 400 बनावट परफ्युमच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या. हे बनावट परफ्युम विकणाऱ्या काही लोकांना पोलिसांनी अटक केली. आश्चर्य म्हणजे नफा कमवण्यासाठी जे परफ्युम विकले जात होते ते घाणेरड्या वस्तूंपासून तयार करण्यात आले होते.
पोलिसांनी या घटनेबाबत दिलेली माहिती अशी की, बनावाट परफ्युम तंतोतत खऱ्या परफ्युमसारखेच दिसत होते, मात्र त्यामध्ये सायनाइडसारखे अनेक विषारी रसायने मिसळली गेली होती. प्रयोगशाळेत या परफ्युमची चाचणी करण्यात आली त्यावेळी या गोष्टी उघडकीस आल्या. आश्चर्य म्हणजे या परफ्युममध्ये मानवी लघवीचे कणही सापडले. हे बनावट परफ्युम वापरणाऱ्या व्यक्तिंना त्वचेला अॅलर्जी होणे किंवा इतरही अनेक प्रकारच्या अॅलर्जीचा त्रास होण्याची शक्यता आहे. यामुळे त्वचेला जळजळ किंवा इतरही जखमा होण्याची शक्यता आहे. बनावट परफ्युमव्यतिरिक्त जप्त करण्यात आलेल्या मस्करा, लिपग्लॉस आदी बनावट सौंदर्यप्रसाधनांमध्ये आर्सेनिक, पारा आणि शिसे मिसळल्याचेही पोलिसांनी सांगितले.
परफ्यूममध्ये सापडले लघवीचे कण
यावर्षी जुलै महिन्यात साऊथपोर्ट टाऊन सेंटरमधून पोलिसांनी तीन तरुणांना मानवी मूत्र असलेल्या बनावट परफ्युमच्या बाटल्यांसह पकडले होते. पोलिसांनी त्यांना रेल्वे स्टेशनवर बनावट ब्रँडच्या बनावट परफ्युम बाटल्यांसह पकडले. ते दुकानदारांना जबरदस्तीने परफ्यूम विकत घेण्याचा आग्रह करत होते. या परफ्युमची चाचणी केली असता त्यामध्ये लघवीचे कण आढळले, असे पोलिसांनी सांगितले.

























































