
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नगर जिल्ह्यात एकाच दिवशी दोन कारवाया करून दोन महिला अधिकाऱयांना अटक केली आहे. पहिल्या कारवाईत जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागातील वरिष्ठ महिला सहायक, तर दुसऱया कारवाईत जीएसटी कार्यालयातील महिला कर्मचाऱयाला अटक करण्यात आली आहे.
चंदा चंद्रकांत ढवळे (वय 45) असे ताब्यात घेतलेल्या वरिष्ठ सहायक महिलेचे नाव आहे. तर, सारिका जयवंत निकम असे जीएसटी कार्यालयातील महिला कर्मचाऱयाचे नाव आहे.
तक्रारदार शिक्षकाची पत्नी जून 2021 मध्ये कोरोनाने आजारी होत्या. मात्र, उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. त्यावेळी तक्रारदाराने पत्नीच्या वैद्यकीय उपचाराचे बिल स्वतः भरले. नंतर ते बिल मंजूर होऊन मिळण्यासाठी श्रीरामपूर पंचायत समितीमार्फत जुलै 2021 मध्ये दाखल केले होते. हे बिल मंजूर करण्यासाठी ढवळे यांनी 5 हजारांची मागणी केल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली होती. त्याअनुषंगाने लाचलुचपतच्या पथकाने 7 नोव्हेंबर रोजी पंच, साक्षीदारांसमक्ष पडताळणी केली असता, ढवळे यांनी 5 हजारांची मागणी करून ती स्वीकारण्याची तयारी दर्शवली होती. त्यानुसार त्यांच्याविरोधात कोतवाली पोलिसांत गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. पोलीस उपअधीक्षक हरिश खेडकर व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली.
दुसऱया कारवाईत तक्रारदाराचा रिटर्न फाईल क्रमांक बंद करण्यात आला होता. तो फाईल क्रमांक पुन्हा मिळावा, याकरिता संबंधित तक्रारदाराने वारंवार जीएसटी कार्यालयात चकरा मारल्या होत्या. संबंधित फाईल निकम यांच्याकडे होती. तक्रारदाराने जीएसटी नंबर घेऊन अकाउंट चालू करून द्या, अशी मागणी केली असता, सारिका निकम यांनी चार हजारांची लाच मागितली होती. त्यानुसार तक्रारदाराने दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक शिरीष कुमार देशमुख यांच्या अधिपत्याखाली हेडकॉन्स्टेबल जी. जी. गोर्डे तपास करत आहेत.





























































